पत्नीच्या फोटोला हार पाहिला, 93 वर्षांच्या गुरुजींनी देह ठेवला, बीडची हृदयस्पर्शी घटना | बीड बातम्या (Beed News)


Last Updated:

Beed News: गुरुजींची नजर हॉलमध्ये ठेवलेल्या पत्नीच्या छायाचित्रावर पडली. त्या फोटोला घातलेला हार पाहून त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पत्नीच्या फोटोला हार पाहिला, 93 वर्षांच्या गुरुजींनी देह ठेवला, बीडची हृदयस्पर्शी घटना
पत्नीच्या फोटोला हार पाहिला, 93 वर्षांच्या गुरुजींनी देह ठेवला, बीडची हृदयस्पर्शी घटना

बीड: आपल्याकडे पती-पत्नी हे सात जन्मांचं नातं मानलं जातं. संपूर्ण आयुष्य जोडीनं जगल्यानंतर दाम्पत्यानं पाठोपाठ जीवनयात्रा संपवली. बीडच्या माजलगाव शहरातील गजाननगर परिसरात ही हृदयस्पर्शी घटना घडली. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसांत पतीनंही अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ नागरिक आणि गजानन महाराजांचे निष्ठावंत भक्त म्हणून परिचित असलेले लक्ष्मीकांत मोताळे गुरुजी (वय 93) यांचे रविवारी निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लक्ष्मीकांत मोताळे गुरुजी आणि त्यांच्या पत्नी मालतीबाई मोताळे हे दोघेही धार्मिक स्वभावाचे होते. वृद्धापकाळामुळे दोघांचीही प्रकृती काही दिवसांपासून खालावलेली होती. 11 जून रोजी मालतीबाई यांचे निधन झाले. त्यावेळी गुरुजींची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना घरातील स्वतंत्र खोलीत विश्रांतीसाठी ठेवण्यात आले होते.

पत्नीच्या निधनाची बातमी ऐकून त्यांना मानसिक धक्का बसू नये, यासाठी कुटुंबीयांनी ही माहिती त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. मालतीबाई यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी गुरुजी काहीसे सावरल्यासारखे वाटत होते. त्यांनी उठून बसत जेवणाचीही विचारणा केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची आशा कुटुंबीयांना वाटू लागली होती.

तो फोटो पाहिला आणि घेतला अंतिम श्वास

रविवारी सकाळी घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांनाच हादरवून सोडले. खोलीबाहेर येताच गुरुजींची नजर हॉलमध्ये ठेवलेल्या पत्नीच्या छायाचित्रावर पडली. त्या फोटोला घातलेला हार पाहून मालतीबाई आता या जगात नसल्याचे त्यांना समजले. पत्नीच्या निधनाची जाणीव होताच त्यांना जबर मानसिक धक्का बसला आणि काही क्षणांतच त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांनीही जगाचा निरोप घेतला.

मालतीबाई यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तर लक्ष्मीकांत मोताळे गुरुजी यांच्यावर रविवारी सायंकाळी मंगळनाथ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे आणि विस्तारित कुटुंब असा मोठा परिवार आहे. आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी राहिलेल्या या दांपत्याची अखेरची कहाणी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *