Why India A Were Penalised 10 Runs : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिंरगा मालिकेतील सामन्यात एक अस नियम चर्चेत आला, ज्याची कधीच चर्चा होत नाही. भारताने 266 धावांचे आव्हान उभे केल्यानंतर श्रीलंका अ संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या षटकात संघाने फक्त 4 धावा केल्या, मात्र षटक संपताच स्कोअरबोर्डवर 14 धावा होत्या. अखेर श्रीलंकेच्या खात्यात अतिरिक्त 10 धावा कशा जमा झाल्या, यामागचे कारण म्हणजे क्रिकेटमधील ‘पेनल्टी रन’चा नियम आहे.
श्रीलंकेला बसल्या जागी मिळाल्या 10 धावा
भारत अ संघाच्या डावात सूर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांनी महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. मात्र त्यांच्या फलंदाजीदरम्यान झालेल्या एका चुकामुळे संपूर्ण संघाला मोठी किंमत मोजावी लागली. क्रिकेटच्या नियमांनुसार फलंदाजांनी धाव घेताना पिचच्या मधून (Protected Area) धावू नये. असे वारंवार झाल्यास पिच खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या नियमाचे उल्लंघन केल्यास पंचांकडून कठोर कारवाई केली जाते.
एकाची चूक, शिक्षा संपूर्ण संघाला
भारत अच्या डावादरम्यान सर्वप्रथम अनुकूल रॉय यांना पिचच्या संरक्षित भागातून धावत गेल्याबद्दल पंचांनी इशारा दिला होता. महत्त्वाची बाब म्हणजे हा इशारा केवळ एका फलंदाजाला नसून संपूर्ण फलंदाजी करणाऱ्या संघाला लागू होतो. यानंतर 35व्या षटकात विपराज निगम यांनी पुन्हा एकदा संरक्षित भागातून धाव घेतली. त्यामुळे पंचांनी नियमांनुसार श्रीलंका अ संघाला 5 पेनल्टी धावा बहाल केल्या.
मात्र त्यानंतरही विपराज यांनी तीच चूक पुन्हा केली. अवघ्या दोन षटकांनंतर त्यांनी चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने खेळून धाव घेताना पुन्हा संरक्षित भागाचा वापर केला. पंचांनी तत्काळ दुसऱ्यांदा 5 धावांची पेनल्टी सुनावली. अशाप्रकारे श्रीलंका अ संघाच्या खात्यात एकूण 10 अतिरिक्त धावा जमा झाल्या.
मग पहिल्या षटकानंतर स्कोअर 14 कसा?
भारताच्या डावात मिळालेल्या 10 पेनल्टी धावा श्रीलंका अ संघाच्या डावाच्या सुरुवातीलाच त्यांच्या खात्यात जमा झाल्या. त्यामुळे श्रीलंका अ संघाची इनिंग 10/0 अशा स्कोअरने सुरू झाली. त्यानंतर पहिल्या षटकात त्यांनी आणखी 4 धावा काढल्या आणि स्कोअर थेट 14/0 वर पोहोचला.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला