अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर किंवा विविध मुलाखतींमध्ये ती बिनधास्तपणे तिची मतं मांडताना, प्रतिक्रिया देताना दिसते. गोविंदासोबत वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे सुनिता प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने तिचं युट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलं. सुरुवातीला लाइमलाइटपासून दूर असलेली सुनिता गेल्या काही महिन्यांत विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये, शोजमध्ये आवर्जून हजेरी लावताना दिसत आहे. पापाराझीसुद्धा तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी उत्सुक असतात. सुनिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ती तिची संपूर्ण संपत्ती कोणाच्या नावावर करणार, याचा खुलासा करताना दिसत आहे. सुनिताने जे नाव घेतलं, ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
सुनिताला नुकतंच मुंबईत तिच्या पाळीव श्वानासोबत पाहिलं गेलं. यावेळी पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी तिच्या मागे धावले. तेव्हा सुनिता तिच्या पाळीव श्वानाचे खूप लाड करताना दिसली. पापाराझींशी त्याची ओळख करून देताना यावेळी सुनिता हसत म्हणाली, “मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या डॉगीच्या नावावर करून टाकेन.” हे ऐकून पापाराझींमधील एकजण मस्करीत तिला विचारतो की, मग गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकचं काय होणार? त्यावर सुनिता म्हणते, “कृष्णा तर माझा मुलगा आहे. त्याच्याकडे आधीपासूनच खूप काही आहे. उलट मला त्याच्याकडून काहीतरी घ्यावं लागेल. कृष्णा आमच्यापेक्षा मोठा आहे. देवाच्या कृपेने तो आणखी पुढे जाऊ दे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्यावर माझा आशीर्वाद कायम राहील.”
पहा सुनिताचा व्हिडीओ-
सुनिताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. प्रॉपर्टी देण्यासाठी सुनिताने तिचा मुलगा यशवर्धन, मुलगी टीना किंवा पती गोविंदाचंही नाव घेतलं नाही, यामुळे नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी कृष्णा अभिषेकसोबतचे वाद मिटल्यामुळे नेटकऱ्यांनी आनंदही व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह यांचे गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्याशी मतभेद होते. कौटुंबिक नात्यातील कटुता अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेत होती. अखेर जेव्हा ‘लाफ्टर शेफ्स’ या शोमध्ये सुनिता पोहोचली, तेव्हा सर्व मतभेद विसरून तिने कृष्णा आणि कश्मिरा यांना मिठी मारली होती. तब्बल 14 वर्षांनंतर हा वाद मिटला होता.