लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उन्हाळी कांद्याचे दर कोसळले आहेत. कमाल बाजार भाव 1851 रुपयांपर्यंत खाली आला आहे. काल शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 256 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
शासकीय कांदा खरेदी अल्प झाल्याने कांद्याची मागणी घटली आहे. प्रतवारीतील घसरण झाल्यामुळे कांदा बाजार भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
आशिया खंडातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावाच्या तुलनेत शनिवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात तब्बल 256 रुपयांची घसरण झाली आहे.
जास्तीतजास्त बाजार भाव 1851 रुपयांपर्यंत खाली आला आहे. शासकीय कांदा खरेदी अल्प प्रमाणात सुरु आहे. देशांतर्गत कांद्याची मागणी घटली तसेच आवक होणाऱ्या कांद्याच्या प्रतवारीत झालेली घसरण ही बाजारभाव कमी होण्यामागील प्रमुख कारणे असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. आज बाजार समितीत 390 वाहनांमधून 5, 828 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे. या लिलावात कांद्याला जास्तीत जास्त 1851 रुपये, कमीतकमी 600 रुपये तर सरासरी 1451 रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला आहे.
या बाजारभावाने परवडत नसल्याने शासकीय कांदा खरेदी 3 हजार रुपये दराने खरेदी करावी अन्यथा पूर्व सूचना न देता रस्तारोको, रेल रोको सारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.





