Last Updated:
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खराब सुरूवातीनंतर टीम इंडियाने मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारली आहे.
मुंबई : महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खराब सुरूवातीनंतर टीम इंडियाने मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 170/6 एवढा स्कोअर केला. शफाली वर्माने मॅचच्या पहिल्याच बॉलला सिक्स मारून तिचा इरादा स्पष्ट केला, पण सिक्स मारल्यानंतर शफालीला एकही रन करता आली नाही. 5 बॉलमध्ये 6 रन करून शफाली आऊट झाली.
शफालीची विकेट गेल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही लवकर माघारी परतली. 7 बॉलमध्ये एक रन करून जेमिमा आऊट झाली. तसिमा रुबाबच्या बॉलिंगवर जेमिमाने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण मिड ऑफला उभ्या असलेल्या नतालिया परवेजने तिचा कॅच पकडला. पहिल्या प्रयत्नामध्ये नतालियाच्या हातातून बॉल सटकला, पण दुसऱ्यांदा तिने कोणतीही चूक केली नाही. जेमिमाचा कॅच पकडल्यानंतर नतालियाने आक्रमक सेलिब्रेशन केलं आणि बॉल मैदानावर जोरात फेकला.
जेमिमा आऊट झाल्यानंतर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी टीमचा डाव सावरला. स्मृती मंधानाने 44 बॉलमध्ये 68 तर हरमनप्रीतने 35 बॉलमध्ये 36 रन केले, पण दोघीही चुकीच्या क्षणी आऊट झाल्या. स्मृती आणि हरमन आऊट झाल्यानंतर भारती फुलमाळीही 3 बॉलमध्ये फक्त 1 रन करू शकली.
रिचा घोषने फिरवलं चित्र
टीम इंडियाची अवस्था 16.2 ओव्हरमध्ये 123-5 अशी होती, त्यामुळे टीमचा स्कोअर 150 रनपर्यंतही होणार नाही, अशी भीती वाटत होती, पण रिचा घोषने 17 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 34 रन केल्या, ज्यात 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी 19व्या ओव्हरमध्ये 23 रन काढल्या ज्यात एक सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. यानंतर 20 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने 15 रन काढले.
टी-20 वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा तिसरा सर्वाधिक स्कोअर आहे. पाकिस्तानकडून सदिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांना 2-2 तर तस्मिया रुबाब आणि रमीन शमीम यांना 1-1 विकेट मिळाली.
Mumbai,Maharashtra
