मुंबई : राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असून दररोज भीषण दुर्घटनेच्या (Accident) घडना समोर येत आहेत. त्यामुळे, रस्ते आणि अपघात हॉट पॉइंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच, सोलापूरच्या माळशिरसमधील अपघाताची घटना दोन महिन्यांपूर्वीच्या दिंडोरी अपघाताच्या घटनेची आठवण करुन देणारी आहे. माळशिरस (Pandhapur) येथील तांदुळवाडी गावाजवळील एका विहिरीत भाविकांचे पिकअप वाहन कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने 5 जणांना वाचविण्यात आलं आहे. मात्र, दोनच महिन्यांपूर्वी नाशिक (Dindori) जिल्ह्याच्या दिंडोरी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता.
सोलापूर जिल्ह्याच्या म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी आलेले भाविक देवदर्शनाहून परतत असताना तांदुळवाडी परिसरातील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले. या वाहनातून रांजणी गावातील 14 भाविक प्रवास करत होते, त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांना वाचविण्यात स्थानिकांना यश आलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तर, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांची धावपळ आणि यंत्रणा हलली. मात्र, येथील रस्त्याबाबत, विहिरीताबाबत तक्रारी करुन देखील कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे, शासनाला किंवा प्रशासनाला केवळ लोकांचे जीव गेल्यावरच जाग येते का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दिंडोरीतील जवळपास 100 फूट मोठ्या काँक्रिटच्या रस्त्याच्या मधोमध विहीर होती, तिला कठडा किंवा सुरक्षासंबंधित कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळेच, तेथे रात्रीच्या सुमारास अपघात 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना 2 एप्रिल 2026 रोजी घडली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांनीही दुर्घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. मात्र, राज्यातील इतर अपघात हॉट पाँईंटचं काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन, तत्सम अधिकारी तक्रारींची दखल का घेत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
माळशिरसच्या तांदुळवाडी परिसरातील विहिरीत पिकअप वाहन कोसळून झालेल्या अपघाताच्या धोकादायक स्पॉटबाबतही येथील ग्रामस्थ सर्जेराव चव्हाण यांनी तक्रार दिली होती, या धोकादायक विहिरीमुळे अपघाताची शक्यता वर्तवत त्यांनी तक्रार दिली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीनंतरही कुठलीही उपाययोजना किंवा दखल शासन-प्रशासन स्तरावरुन घेण्यात आली नाही. त्यामुळेच, पुन्हा एकदा अपघाताला निमंत्रण देत 8 निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय.
खासदार धैर्यशील मोहिते पाटलांकडून संताप
या भागात अनेक ठिकाणी असे धोकादायक स्पॉट आहेत, चार-चार वर्षे झाले तरीही कामं होत नाहीत. आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, बैठका घेतल्या तरीही कुठलीही प्रगती दिसून येत नाही. सुरक्षेच्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या कुठल्याही करण्यात आल्या नाहीत. दरमहिन्याला एक अपघात होतो, वारंवार पत्रव्यवहार करुनही शासन दुर्लक्ष करतं. आम्ही मंत्रालयीन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर फॉलोअप घेतालय, पण लोकांचे जीव गेले तरीही कुणालाच काही फरक पडत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. त्यावरुन, सरकारी यंत्रणा किती ढिसाळ आणि बेजबाबदार असल्याचं दिसून येतय.
दिंडोरीत विहीर मालकावर गुन्हा दाखल
दिंडोरीतील अपघातप्रकरणी विहीरीचे मालक ॲड. विक्रम राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होती की, “ही विहीर 1972 पासून येथे आहे. दुष्काळकाळात याच विहिरातून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. या विहिरीवर आधी जाळी व अँगल होते, मात्र ते कोणीतरी काढून नेले. आम्ही नगरपंचायतीकडे विहीरीवर जाळी बसवून देण्याची मागणीही केली होती. मात्र, प्रतिसादन मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप