80 च्या दशकातील लोकप्रिय धार्मिक मालिका ‘रामायण’ मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुनील लहरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांची चर्चा कोणत्याही मालिकेमुळे किंवा चित्रपटामुळे नसून त्यांच्या शेतीप्रेमामुळे होत आहे.
अभिनयविश्वापासून काहीसे दूर असलेले सुनील लहरी सध्या सेंद्रिय शेतीत रमल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या फार्महाऊसची आणि तिथे सुरू असलेल्या शेतीची सविस्तर माहिती चाहत्यांना दिली.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले असून सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. व्हिडिओमध्ये सुनील लहरी यांनी त्यांच्या शेतात उगवलेल्या विविध पिकांची माहिती दिली. त्यांच्या फार्महाऊसमध्ये पालक, मेथी, टोमॅटो, हिरवी मिरची, फ्लॉवर, कोबी आणि ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे.
याशिवाय टरबूज, केळी, पपई आणि काजू यांसारखी फळझाडेदेखील त्यांनी लावली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची पिके पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी ही सर्व उत्पादने त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवली जात असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला.
या व्हिडिओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुनील लहरी केवळ पिकांची माहिती देताना दिसले नाहीत तर प्रत्यक्ष शेतात काम करतानाही दिसले. ते शेवगा तोडताना आणि शेतीची निगा राखताना पाहायला मिळाले.




