देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा


पुणे : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून गणले जाणारे शिवमंदीर श्रीक्षेत्र भिमाशंकर (bhima shankar) मंदिराच्या नव्या सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभामंडपावरील मुकुटाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी दीपमाळेचेही पूजन झाले. आता, गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले हे तीर्थस्थळ 15 जूनपासून मर्यादित स्वरूपात भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह येथील उपक्रमास पुणे जिल्ह्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते. तर, पुणे जिल्ह्यातील ठाकरेंचे एकमेव आमदार बाबाजी काळे (shivsena UBT) यांचीही उपस्थिती होती. मात्र, या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार (खेड विधानसभा) बाबाजी काळे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह वळसे पाटील यांनी धरला असताना फडणवीसांनी केलेल्या एका सूचक खुलाशामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमादरम्यान वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बाबाजी काळेंसोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यावर फडणवीसांनी मिश्कील शैलीत, “फोटोची गरज नाही… बाबाजींना आम्ही एक प्रपोजल दिलं आहे,” असे वक्तव्य केले. मात्र प्रपोजल नेमकं कशाचं, याबाबत त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्‍यांच्या या वक्तव्याचा जो तो आपल्या परीने राजकीय अर्थ लावत आहे. कारण, बाबाजी काळे हे उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या या वक्तव्याला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हे प्रपोजल केवळ मिश्कील टिप्पणी होती की त्यामागे काही मोठं राजकीय गणित दडलं आहे, याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार असून उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठकही बोलावली आहे. त्यातच, आता पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदारही भाजपच्या गळाला लागले की काय अशी चर्चा आजच्या कार्यक्रमानंतर होत आहे. 

भिमाशंकर मंदिरात 15 जूनपासून भाविकांना दर्शन

भिमाशंकर मंदिर परिसरातील विकासकामांमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सभामंडपाचे काम पूर्णत्वास पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सभामंडपावरील मुकुटाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरातील दीपमाळेचेही पूजन करण्यात येणार आहे. १५ जूनपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत मर्यादित संख्येने भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाकडून कमालीची गोपनीयता राखण्यात आली असून दौऱ्याचे तपशील अत्यंत मर्यादित स्तरावर ठेवण्यात आलेत. माध्यमांना ही मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आलेले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *