गडचिरोली : राज्यात एकीकडे ठाकरेंच्या शिवसेना (shivsena UBT) खासदारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबविण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी उद्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवेंचा मराठवाडा दौरा सुरू असून त्यांच्या दौऱ्यात उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर येत असल्याचं दिसून येतं. लातूरमध्ये (Latur) आज दानवेंच्या उपस्थितीतील आढावा बैठकीत गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. तत्पूर्वी, गडचिरोलीतही (Gadchiroli) ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. वासुदेव शेडमाके यांना पक्षाने पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी राडा घातला.
गडचिरोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे. जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच पक्ष कार्यालयातच तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कार्यालयातील पीओपी फोडण्यात आली, तर टेबल, खुर्च्या, पंखे, एसी आणि अगदी बल्बसुद्धा माजी जिल्हाप्रमुखांनी काढून नेले आहे. गडचिरोली जिल्हाप्रमुख पदासाठी नव्या नियुक्त्या जाहीर होताच हा वाद पेटला. शिवसेना उबाठा पक्षाने गडचिरोली आणि आरमोरी विधानसभेसाठी पवन गेडाम आणि अहेरी विधानसभेसाठी दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. मात्र, यापूर्वी जिल्हाप्रमुख असलेल्या वासुदेव शेडमाके यांनी पक्षाने आपल्याला डावलल्याच्या नाराजीतून कार्यालयातील साहित्य काढून नेले. एकीकडे नव्या नियुक्त्यांमुळे संघटनात्मक बदल करण्यात आले, तर दुसरीकडे पक्ष कार्यालयातील तोडफोडीमुळे शिवसेना उबाठा गटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आता या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार आणि संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूरमध्येही अंबादास दानवेंच्या बैठकीत राडा
लातूरमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. बैठकीदरम्यान एका पदाधिकाऱ्याने व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तुलना करणारे वक्तव्य केल्याने काही कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर अंबादास दानवे यांनी हस्तक्षेप करत संबंधितांना शांत केले आणि बैठक पुन्हा सुरळीत पार पडली.
हेही वाचा
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!