Danni Wyatt-Hodge: कधी काळी केलं होतं विराट कोहलीला प्रपोज अन् आता महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये शतकी तडाखा! इंग्लंडने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या सुद्धा रचली


Danni Wyatt-Hodge: आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या उद्घाटन सामन्यात, यजमान इंग्लंडने श्रीलंकेला 87 धावांनी पराभूत करत दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅममधील एजबस्टनमध्ये झालेल्या या सामन्यात, इंग्लंडच्या विजयाची स्टार खेळाडू डॅनी वायट-हॉज होती, जिने 62 चेंडूंमध्ये 105 धावांची नाबाद स्फोटक खेळी करून संघाला विक्रमी धावसंख्येपर्यंत पोहोचवले. वायटने आपल्या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार मारला. महिला विश्वचषकात शतक झळकावणारी डॅनी वायट-हॉज ही इंग्लंडची दुसरी फलंदाज आहे. यापूर्वी हेदर नाईटने ही कामगिरी केली होती. नाईटने 2020 च्या विश्वचषकात थायलंडविरुद्ध 108* धावा केल्या होत्या. वायटच्या शानदार फलंदाजीमुळे इंग्लंडने 20 षटकांत 219/1 अशी मोठी धावसंख्या उभारली, जी महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे.

डॅनी वायट-हॉजला तिची सलामीची सहकारी एमी जोन्सकडूनही उत्कृष्ट साथ मिळाली. एमी जोन्स 38 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह 53 धावा करून बाद झाली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 135 धावा जोडून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव आणला. त्यानंतर कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने नाबाद 46 धावांची वेगवान खेळी करून इंग्लंडच्या डावाला बळकटी दिली. 220 धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेवर सुरुवातीपासूनच दबाव दिसत होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेत संपूर्ण संघाला 132 धावांवर बाद केले. फ्रेया केम्पने उत्कृष्ट गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आणल्या. या विजयामुळे इंग्लंडने मायदेशात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत आपला इरादा स्पष्ट केला आहे आणि स्पर्धेची अविस्मरणीय सुरुवात केली आहे. डॅनी वायटला तिच्या शानदार खेळीसाठी ‘सामनावीर’ म्हणूनही गौरविण्यात आले.

विराट कोहलीला लग्नाची मागणी कधी घातली होती?

एप्रिल 2016 मध्ये, डॅनी वायटने ट्विटरवर ‘कोहली, माझ्याशी लग्न कर’ असे पोस्ट केले. तिची ही पोस्ट झटपट व्हायरल झाली आणि क्रिकेट विश्वात चर्चेचा एक मोठा विषय बनली. नंतर कोहली आणि वायट यांची भेट झाली. कोहलीने तिला ट्विटरवर अशा गोष्टी न बोलण्यास सांगितले, कारण लोक त्या गोष्टी गांभीर्याने घेतात. हळूहळू हा प्रसंग त्या दोघांमध्ये एक मैत्रीपूर्ण विनोद बनला. कालांतराने त्यांची चांगली मैत्री झाली आणि त्याच वर्षी विराट कोहलीने डॅनी वायटला एक बॅट भेट म्हणून दिली. डॅनी वायटने तिचा दीर्घकाळचा जोडीदार जॉर्जी हॉजसोबत लग्न केले असून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *