ठाण्यातील वृद्धाला बेदम मारहाण करणारा परप्रांतीय अडचणीत, एकनाथ शिंदेंचा पोलिसांना फोन, दिले मोठे आदेश – Marathi News | Thane elderly man assault case eknath shinde calls police orders strict action against cab driver


ठाण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे, एका परप्रांतीय कॅब चालकाने एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. ठाण्यातील जुपिटर रुग्णालयाच्या बाहेर ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. किरकोळ कारणावरून ही मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीवेळी वयोवृद्ध जमिनीवर कोसळला होता. यानंतर दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी तात्काळ मारहाण करणाऱ्याचा शोध घेऊन परप्रांतीय ओला चालकाला शिवसेना स्टाईलने चोप दिला. या घटनेची दखल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे.

शिवसेनेकडून परप्रांतीयाला चोप

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर काल सायंकाळी सहा वाजताचा सुमारास किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने वृद्ध व्यक्तीला अत्यंत गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे सुमित बोराडे, तसेच शिवसेना शिंदे गटाचे नितेश पाटोळे हे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी परप्रांतीय ओला चालकाला पकडून शिवसेना स्टाईलने चोप दिला. त्यानंतर शिवसेनेने आरोपीला वर्तकनगर पोलीसांच्या ताब्यात देत त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

मनसेही रस्त्यावर

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आज मनसेने आंदोलन केले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी अविनाश जाधव यांनी जशास तसे उत्तर दिले जाणार असल्याचे म्हटले. तसेच रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती अगोदर झाली असती तर ही वेळ आली नसती असंही जाधव यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांचा पोलीस आयुक्तांना फोन

ठाण्यातील या घटनेची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे. शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना फोन करत ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणाऱ्यावर कलम 307 लावण्याचे आदेश दिले. तसेच मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आता ठाणे पोलिसांकडून मारहाण झालेल्या नागरिकाचा शोध सुरु आहे. वृद्ध नागरिकाने कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न केल्याने पोलिसांना मारहाण करणाऱ्या ओला चालकावर कारवाई करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे या वृद्ध नागरिकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 4 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *