‘विठुमाऊली’ची रखुमाई झाली ‘कृष्णाई’ची लेक! एकता लब्देने सांगितला निवेदितांसोबतच्या कामाचा अनुभव; म्हणाली, ‘पहिल्या दिवशी मला…’ | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Krushnaichya Leki : अभिनेत्री एकता लब्दे निवेदिता सराफ यांसोबत ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत झळकणार आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिच्यासोबत असं काही घडलं ज्याची अपेक्षाही तिने केली होती. तिने आपला अनुभव मांडला आहे.

News18
News18

‘विठुमाऊली’ मालिकेत रखुमाई म्हणून झळकलेली अभिनेत्री एकता लब्दे आता कृष्णाईची लेक झाली आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत ती शारदा ही भूमिका साकारत आहे. कृष्णाई म्हणजे निवेदिता सराफांच्या लेकीच्या भूमिकेत शारदा आहे. नव्या मालिकेत निवेदिता सराफांसोबत काम करण्याचा अनुभव शारदाने मांडला आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिच्यासोबत असं काही घडलं ज्याची अपेक्षाही तिने केली होती. तिच्यासोबत जे काही घडलं ते तिने सगळं सांगितलं आहे.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या एकताने याआधीही अनेक भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत ‘शारदा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मधील शारदा ही समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या भावनांनाही बाजूला ठेवणारी मुलगी असून, या भूमिकेद्वारे एकता प्रेक्षकांसमोर एका नव्या रूपात येत आहे.

“माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शारदा आहे. शारदा ही शांत आणि अबोल आहे. शारदा मनातलं मनात ठेवणारी, शांत आणि समजूतदार आहे, शारदाच्या भूमिकेसाठी मला बऱ्याच गोष्टी अॅडजस्ट कराव्या लागत आहेत, कारण माझे आणि शारदाचे स्वभावगुण खूपच वेगळे आहेत. शारदा कृष्णाईची सावली आहे. त्यामुळे तिला तिच्या दोन बहिणींचाही आईसारखाच सांभाळ करावा लागतो. याआधीची माझी भूमिका प्रेमळ होती, त्यामुळे मला ही भूमिका साकारताना थोडं सोपं जात आहे. थोडासा कृष्णाईसारखा स्वभाव जुळवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. मला या भूमिकेसाठी कॉल आला होता आणि माझं ऑडिशन ठाण्यात झालं. मुळात त्यांना प्रेमळ, सौजन्यशील, साधी, सुंदर आणि समजूतदार असा चेहरा हवा होता. शारदाच्या भूमिकेसाठी मी त्यांना योग्य वाटले, याचा मला आनंद आहे. जेव्हा मला समजलं की ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये कृष्णाईच्या मुलीच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आझाली आहे, ते ऐकून मला फार आनंद झाला.

खूप महिन्यांनंतर मी पुन्हा कॅमेरा फेस करत होते. शूटिंगचा पहिला दिवस खूप छान होता. अभिनय ही माझी आवड आहे. आज माझ्याकडे काम आहे. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. फार कमी लोकांना असं भाग्य लाभतं. पहिल्या दिवसाच्या शूटिंगमध्ये मला थोडी धाकधूक होती, कारण या भूमिकेसाठी कोल्हापूरकडची भाषा वापरायची होती, माझी या आधीची भूमिका वेगळ्या ढंगाची होती. मुळात मी कोकणातील असल्यामुळे मला भाषेवर काम करावे लागले. मी स्थानिक लोकांचे निरीक्षण मी करत असते. मला फक्त भाषेचं टेन्शन होतं की मी योग्य बोलते आहे का. पण सेटवर सगळे कलाकार आणि दिग्दर्शक इतके कमाल आहेत की ते सगळं समजावून सांगतात आणि सांभाळून घेतात.

मुंबईच्या बाहेर शूटिंग करणं माझ्यासाठी कठीण आहे. कुटुंबाला सोडून शूटिंगसाठी मुंबईबाहेर राहणं अवघड वाटत. पण सुरुवातीचं शूटिंग साताऱ्यात होत आणि सुदैवाने माझी टीम खूप चांगली आहे. आमचं प्रॉडक्शन हाऊस खूप सपोर्टिव्ह आहे आणि सहकलाकारही कमाल आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर राहून शूटिंग करणं सोपं वाटलं . सहकलाकार आणि टीम उत्तम आहेत. माझं, नारायणीचं आणि ट्विंकलचं खूप कमी वेळात छान बॉण्डिंग झालं आहे. मी आणि नारायणी आधीपासून एकमेकींना ओळखत होतो. आम्ही तिघी सेटवरही सख्या बहिणींप्रमाणे वावरतो. निवेदिता ताई आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात. पहिल्या दिवशी मला खूप टेन्शन होतं की माझ्यामुळे सीनचे रिटेक्स नको व्हायला. पण सगळे खूप समजूतदार आहेत. मुंबईबाहेर शूट असल्यामुळे एकत्र राहिल्यामुळे आमची खूप छान टीम तयार झाली आहे.

निवेदिता ताई कृष्णाईची भूमिका साकारणार आहेत हे कळल्यावर माझा आनंद अनावर झाला होता. मला निवेदिता सराफ, अश्विनी भावे आणि अलका कुबल या मराठीतील दिग्गज अभिनेत्री खूप आवडतात. मराठीत निवेदिता ताई आणि हिंदीत नीतू सिंग या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांचे चित्रपट पाहत मी लहानाची मोठी झाले. अभिनय करण्यासाठी प्रेरणा मला त्यांच्या भूमिकांमधून मिळाली आहे.निवेदिता ताई स्वभावाने खूप छान आहेत. मी त्यांच्यासोबत सातारा एक्सप्लोर केल आहे. एक दिवस शूटिंगला सुट्टी होती, तेव्हा आम्ही एकत्र फिरलो, शॉपिंग केलं आणि खूप छान वेळ घालवला. एवढ्या उंचीवर पोहोचूनही इतकं सौजन्यशील, समजूतदार आणि प्रेमळ राहणं हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. शारदाची भूमिका साकारताना मी निवेदिता ताईंकडून भरपूर काही शिकून घेणार आहे. आम्ही कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे त्या आमची अगदी आईसारखी काळजी घेतात.

‘कृष्णाईच्या लेकी’ ही अशा स्त्रियांची आणि मुलींची गोष्ट आहे ज्या आयुष्यात आलेल्या संकटांवर आणि दुःखांवर मात करून जिद्दीने पुढे जात राहतात. कृष्णाईच्या तिन्ही लेकी खूप खास आहेत. एक बेधडक आहे, एक खेळाडू आहे आणि एक खूप जबाबदार, आईला व बहिणींना सांभाळणारी आहे आणि तुम्हाला यांचा हा प्रवास पाहायला नक्की मज्जा येणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

‘विठुमाऊली’ची रखुमाई झाली ‘कृष्णाई’ची लेक! एकता लब्देने सांगितला निवेदितांसोबतच्या कामाचा अनुभव; म्हणाली, ‘पहिल्या दिवशी मला…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *