Last Updated:
घाबरलेल्या शाहिन यांनी तत्काळ घरमालकांना बोलावून वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
छत्रपती संभाजीनगर : ज्यांनी हाताला धरून चालायला शिकवलं, त्याच वडिलांना लेकानं झोपेतच संपवलं. छत्रपती संभाजीनगरमधील कटकट गेट परिसरात ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. 19 वर्षीय मुलानं कौटुंबिक वादातून झोपेत असलेल्या पित्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार केला आणि त्यांची निर्घृण हत्या केली. मती शेख असं मृताचं नाव असून आरोपी मुलगा अजीऊल शेख फरार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मती यांची मुलगी शाहिन शेख मती शेख (23) हिने या प्रकरणी तक्रार दिली आहे. शाहिन यांचे वडील शेख मती आणि भाऊ अजीऊल शेख हे पश्चिम बंगाल येथून मोलमजुरीसाठी शहरात आले होते. गेल्या सात महिन्यांपासून बाबर कॉलनी, कटकट गेट परिसरात ते भाड्याने राहत होते.
8 जूनच्या रात्री तिघांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर झोप घेतली. मात्र 9 जून रोजी सकाळी 7.15 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान शाहिन झोपेतून उठल्या. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांना अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले. त्यांचे वडील बिछान्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता, तर जवळच एक लाकडी दांडा पडलेला होता. त्याचवेळी भाऊ अजीऊल हा घरातून निघून गेल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
घाबरलेल्या शाहिन यांनी तत्काळ घरमालकांना बोलावून वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
शाहिन शेख यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात भाऊ अजीऊल शेख याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कौटुंबिक कारणातून झाली की त्यामागे आणखी काही कारण आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.
वडिलांचा खून केल्यानंतर आरोपी अजीऊल शेख घरातून पसार झाला. घटनेनंतर तो परतलाच नसल्याने जिन्सी पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखेचे पथकही त्याचा माग काढत आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Aurangabad,Maharashtra
Jun 10, 2026 11:57 AM IST
