अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाखांची लाच घेताना अटक, महसूल विभागात खळबळ | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

जालना जिल्ह्यातील अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

विजय चव्हाण (अंबड तहसीलदार)
विजय चव्हाण (अंबड तहसीलदार)

रवी जैस्वाल, प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अवैध वाळू वाहतूक आणि पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदाराचे पोकलेन मशीन आणि ६ हायवा ट्रकद्वारे अवैध वाहतूक सुरू होती. या वाहनांवर आणि पोकलेनवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता ती नियमित सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने तक्रारदाराकडे दरमहा तब्बल ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तहसीलदाराने एवढी मोठी रक्कम मागितल्याने फिर्यादीने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला. त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) रीतसर तक्रार नोंदवली.

बीड एसीबीने सापळा रचून कारवाई केली

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने अंबड येथे सापळा रचला. दरमहा ७ लाख रुपये मागितले होते, परंतु फिर्यादीने तहसीलदाराला ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे मान्य केले. शनिवारी ठरलेली लाचेची रक्कम ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. तहसीलदार विजय चव्हाण याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून वाळू माफिया आणि महसूल विभागाचे आर्थिक लागेबांधे उघड झाले आहे. कारवाई न करण्यासाठी लाच घेणारे असे इतरही अधिकारी एसीबीच्या रडारवर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *