मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan parishad) अनुषंगाने महायुतीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना आपल्याकडे मागत असताना, ती जागा भाजपला देण्यात आली. त्यावरुन, येथील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul sattar) चांगलेच संतापले आहेत. सत्तार यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली असून दोन्ही शिवसेनेनं एकत्र येण्याची गरजही व्यक्त केली. त्यावरुन, आता राजकीय वातावरण तापलं आहे. अब्दुल सत्तार यांचे राजकीय विरोधक तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला. तसेच,
महायुतीत एकमताने जेव्हा जागावाटप झालं, तेव्हा प्रत्येक नेत्याला आपापल्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज होती. सुहास शिरसाट यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर याच मतदारसंघातून अब्दुल सत्तारच्या मुलाला अर्ज भरायला लावायची गरज नव्हती. अब्दुल सत्तार यांना अहंकार होता, त्यांची तुम्ही भाषा बघितली का? माझ्याशिवाय या राज्याचा मुख्यमंत्री ठरू शकत नाही. मी कुत्ता निशाणी घेतली तरी निवडून येईल,अशी अब्दुल सत्तार यांची भाषा होत, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी विधानपरिषद निवडणुकांतील महायुतीतील नाराजी आणि शिवसेना आमदार अब्दुल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
अब्दुल सत्तारांना निवडणुकीत अहंकार होता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अब्दुल सत्तारांनी सांगितले की, मी युती करणार नाही, त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढली, आम्हीही लढलो. महापालिकेमध्ये आमच्या पारड्यात जास्त मतं जनतेने टाकली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील नेते एकत्र बसले होते. अब्दुल सत्तार तेव्हा म्हणाले, मी युतीला बसणार नाही, मला युती करायची नाही. माझ्या विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवणार. अब्दुल सत्तार यांना आधीच्या निवडणुकीमध्ये अहंकार होता, गवताच्या गंजीवर उभा असलेला माणूस आगीशी खेळणार नाही, असे म्हणत रावसाहेब दावनेंनी अब्दुल सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला.
4 तारखेला उभं राहून दाखवाच
दोन शिवसेना एकत्र यायला हव्यात असं अब्दुल सत्तार म्हणू शकत नाहीत. एवढं मोठं जे उभं केलंय ते सगळं धाडकन खाली येऊन जाईल, असा इशाराच दानवेंनी अब्दुल सत्तार आणि शिवसेना नेत्यांना दिलाय. अब्दुल सत्तार यांना प्रकाश झोतात राहायचं असतं. कधीतरी काहीतरी स्टंटबाजी त्यांना करायचा असतो. स्टंटबाजी नाहीतर काय, त्यांनी चार तारखेला उभे राहून दाखवावं, ते राहणारच नाहीत असे म्हणत दानवेंनी एकप्रकारे अब्दुल सत्तार यांना आव्हानच दिलंय. पॉलिटिकली अब्दुल सत्तार आणि माझं कधीच पटणार नाही, माझ्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात जे काय करायचंय ते करतातच. माझा मतदार लंब्या टोपीचा आहे, त्यांचा मतदार गोल टोपीचा आहे. ते माझ्या ताटात येऊन जरी जेवले तरी त्यांचे लोक मला मत देत नाहीत हे ठरलेलं आहे, असे म्हणत रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तार यांच्या वोटबँकवर भाष्य केलं.
अब्दुल सत्तारांच लोक एवढं ऐकतात, त्यांच्यामुळेच ते म्हणतात की, मी लोकसभेत पडलो. मग, त्यांना विधानसभेत किती मत मिळाले आणि किती मतांनी ते जिंकून आले? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच, संख्या आणि ताकद जास्त असताना आमच्या मित्रपक्षाने आमच्यावर अन्याय झाला म्हणून जागा गेली असं म्हणणं योग्य नाही. पक्षाच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. माझी आताही खात्री आहे, 4 तारखेला या विषयावर मी बोलेल, 4 तारखेनंतर मला योग्य प्रतिक्रिया देता येईल, असे दानवे यांनी म्हटले.
ज्याचं संख्याबळ जास्त, त्या पक्षाचा दावा
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हे तिन्ही नेते एकत्रित बसले, त्यांनी आकडेवारी बघितली. ज्याठिकाणी ज्यांचं संख्याबळ जास्त आहे, त्या ठिकाणी त्यांनी दावा सांगितला. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे या तीन चार जागांचा दावा दोन-तीन पक्षांचा कायम होता, अशी माहितीही दानवेंनी दिली.
हेही वाचा
आणखी वाचा