छ. संभाजीनगर : अंतरवाली सराटीतील उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर, आज रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर जरांगे पाटील थेट अंतरवलीमध्ये पोहोचले. यावेळी, अंतरवालीतील ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. दरम्यान, संभाजीनगरहून ते पांढऱ्या रंगाच्या डिफेंडर कारमधूनच अंतरावलीत आले. त्यानतंर, ती डिफेंडर (Defender) कार, त्या गाडीच्या मालकाला त्यांनी परत केली. जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांना वापरण्यासाठी एका मराठा बांधवाने ही कार दिली होती.
मनोज जरांगे यांच्या सांगणयावरुन अखेर जरांगे पाटील यांना दिलेली डिफेंडर गाडी मालकाने परत नेली. जरांगे यांनी त्यांना गाडी घेवून जा, असे सांगत फोन केला असल्याची माहिती आहे. सुभाष भोसले असे डिफेंडर कारच्या मालकाचे नाव असून ते चिकमहूद, ता. सांगोला येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याच मालकीची ही गाडी होती. भोसले यांचा सराफा व्यवसाय आणि शेती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांकडे तपास यंत्रणांनी धाडी टाकल्याची चर्चा होती. भोसले यांच्या कोलकत्ता येथील व्यवसायावर देखील केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडल्या असल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वीच झाली होती. त्यामुळे, पुन्हा एकदा भोसले चर्चेत आले होते.
डिफेंडर कारच्या चर्चेवरुन झालेल्या टीकेनंतर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. माझ्यावर जळणाऱ्याची संख्या खूप आहे. मी डिफेंडरमध्ये फिरतोय म्हणून टीका आणि गैरसमज समाजात पसरवत आहेत. मात्र, यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का? मला जात मोठी करायची आहे म्हणून माझ्यावर माझी जात प्रेम करतीय. तुला काय करायचंय, मी कोणत्याही गाडीत बसेल. माझ्या समाजाचे लेकरं मला लाल दिव्याच्या गाडीत बसलेले बघायचे आहेत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी टीकाकारांना चांगलाच सुनावलं होतं.
अंतरवाली आपल्यासाठी पंढरपूरसारखं
जरांगे पाटील यांनी अंतरवालीत पोहोचल्यानंतर बांधवांशी संवाद साधला. एवढा जीव तोडून सगळ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कोणाला नाव पण ठेवू नका, सगळे आपलेच आहे. डोक्यात अजिबात काहीही ठेवू नका लगेच काढून टाका, आपलं गाव आहे, आपल्या राज्यासाठी लढतंय, गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा कल्याण झालं तेवढेच डोक्यात ठेवा. गावातल्या माणसाचं अजिबात कोणी डोक्यात ठेवायचं नाही. आपण सगळे गाऱ्हाणे पंढरपुरात मांडतो, पांडुरंगाकडे त्याचप्रमाणे लोकांच्या वेदना ऐकून घ्यायच्या आणि त्या सोडायच्या, यासाठी आपलं अंतरवाली गाव आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. मी जिवंत आहे तोपर्यंत आंतरवालीला डाग लागू देत नाही, आता असं झालंय की मला सुद्धा करमत नाही (मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर) आपलं असं झालं की मायलेकरासारखं घट्ट नातं झाल्यासारखं ,त्यामुळे ते तुटूच शकत नाही. मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर मलाच करमेना, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले