Duleep Trophy : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास; 1 डाव अन् 210 धावांनी विरोधी टीमचा पराभव, थेट गाठली सेमीफायनल


East Zone beat North East Zone by an innings and 210 runs : दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात ईस्ट झोनने नॉर्थ ईस्ट झोनचा एक डाव आणि 210 धावांनी दारुण पराभव करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सेलन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात ईस्ट झोनच्या अष्टपैलू कामगिरीसमोर नॉर्थ ईस्ट झोनचा संघ पूर्णपणे ढेपाळला.

ईस्ट झोनची 467 धावांची बलाढ्य मजल (East Zone takes control of Duleep Trophy quarterfinal)

सामन्यात नॉर्थ ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ईस्ट झोनची सुरुवात अडखळती झाली. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या षटकात 2 चौकार मारले खरे, पण अखेरच्या चेंडूवर तो अवघ्या 8 धावांवर बाद झाला. कर्णधार ईशान किशनही फलंदाजीत अपयशी ठरला आणि अवघ्या 4 धावा करून माघारी परतला. पण, सुदीप कुमार घरामी आणि शाहबाज अहमद यांनी शानदार शतके ठोकून ईस्ट झोनची कमान सांभाळली. सुदीप कुमार घरामीने 146 धावा, तर शाहबाज अहमद 167 धावांची तुफानी खेळी खेळली. तसेच कुमार कुशाग्र अर्धशतक ठोकले आणि या त्रिकुटाच्या जोरावर ईस्ट झोनने पहिल्या डावात 467 धावांचा डोंगर उभा केला.

नॉर्थ ईस्टचा पहिला डाव 111 धावांत गुंडाळला

467 धावांचा पाठलाग करताना नॉर्थ ईस्ट झोनचा पहिला डाव अवघ्या 111 धावांवर आटोपला. ईस्ट झोनच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध मारा केला. नॉर्थ ईस्टचे 6 फलंदाज तर दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. त्यांच्याकडून अर्पित भटेवाराने सर्वाधिक 32 धावा केल्या. पहिल्या डावात ईस्ट झोनच्या अभिजीत सरकारने 5 बळी घेतले, तर शाहबाज अहमदने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले.

वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास

पहिल्या डावात मोठी पिछाडी राहिल्याने नॉर्थ ईस्ट झोनवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. दुसऱ्या डावातही त्यांच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आणि संपूर्ण संघ 146 धावांवर गारद झाला. अनुकूल रॉयने दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. तर फलंदाजीत अपयशी ठरलेल्या वैभवने गोलंदाजीत चुणूक दाखवत 3 षटकांत 11 धावा देऊन 2 विकेट टिपले.

शाहबाज अहमद ठरला ‘सामनावीर’ 

पहिल्या डावात 167 धावांची तुफानी खेळी आणि दोन्ही डावांत मिळून 4 बळी घेणाऱ्या शाहबाज अहमदला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मोठ्या विजयामुळे ईस्ट झोनचा आत्मविश्वास उंचावला असून आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना सेंट्रल झोन विरुद्ध होणार आहे. हा उपांत्य फेरीचा सामना 30 ऑगस्टपासून खेळवला जाईल. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार ईशान किशन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

हे ही वाचा –

IND vs SL 2nd Test : डोळे वटारले, बॅट आपटली! यशस्वी, फर्नांडोनंतर आणखी एक खेळाडू गोत्यात; मैदानात असं काय घडलं की ICC थेट मोठी शिक्षा सुनावली, पाहा VIDEO





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *