Movies & Series on Partition 1947: ‘बटवारा 1947’ (Batwara 1947)शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या निर्मितीची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्याआधी फाळणीच्या काळातील मानवी शोकांतिका अत्यंत बारकाईने पडद्यावर मांडणारे हे पाच चित्रपट-मिनी सीरिज नक्की पाहा..
1947 हे असं वर्ष आहे, जे भारत आणि पाकिस्तानमधील लोक कधीही विसरू शकत नाहीत. याच वर्षी भारताची फाळणी झाली आणि हिंदू, मुस्लिम, शीख अशा अनेकांना आपली पिढ्यान् पिढ्यांची घरं सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. कुटुंबाची, घराची ताटातूट झाली. सिनेमातही वेळोवेळी भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आल्या आहेत.
फाळणीच्या पार्श्वभूमीवर अनेक ऐतिहासिक चित्रपट तयार झाले, मिनी सीरिज आणि डॉक्युमेंट्रीही प्रदर्शित झाल्या. नुकताच सनी देओलचा 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘बटवारा: 1947’ हा चित्रपटही भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच उत्कृष्ट कलाकृतींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी फाळणी आणि त्यातून निर्माण झालेली मानवी शोकांतिका वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पडद्यावर मांडली.
गरम हवा
एम. एस. सथ्यू यांच्या दिग्दर्शनाखाली 1973 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गरम हवा’ हा फाळणीनंतरच्या परिस्थितीचं चित्रण करणाऱ्या सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक मानला जातो. फाळणीनंतरच्या काळावर आधारित या चित्रपटाची कथा सलीम मिर्झा (बलराज साहनी) यांच्या भोवती फिरते. ते उत्तर भारतात राहणारे मुस्लिम व्यावसायिक असतात. पाकिस्तानात जाण्याऐवजी ते भारतातच राहण्याचा निर्णय घेतात.
भारतामधील आपल्या पिढीजात घरामुळे ते हा निर्णय घेतात. मात्र, पुढे हेच घर त्यांच्या आर्थिक अडचणींचं कारण ठरतं. शेजारी त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागतात. या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पाल्मे डी’ओर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
तमस
गोविंद निहलानी यांच्या दिग्दर्शनाखाली 1988 मध्ये आलेली टेलिव्हिजन मिनी सीरिज ‘तमस’ ही भीष्म साहनी यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. फाळणीच्या काळात झालेल्या सांप्रदायिक हिंसाचाराची कहाणी या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. 1947 मधील रावळपिंडी दंगलीच्या घटनांचं अत्यंत प्रभावी चित्रण यात करण्यात आलं आहे.
कथेची सुरुवात सफाई कर्मचारी नत्थूपासून होते. परिसरातील एक मुस्लिम नेता त्याला डुक्कर मारण्यासाठी प्रवृत्त करतो. हे काम प्राण्यांच्या उपचारासाठी असल्याचं सांगून नत्थूला फसवलं जातं. मात्र, मशिदीबाहेर त्या प्राण्याचा मृतदेह आढळल्यानंतर सांप्रदायिक हिंसाचार भडकतो. या मिनी सीरिजमध्ये नत्थूची भूमिका ओम पुरी यांनी साकारली आहे.
1947 अर्थ
दीपा मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला आमिर खान स्टारर ‘1947 अर्थ’ हा चित्रपट फाळणीच्या काळातील घटना एका महिलेच्या दृष्टिकोनातून मांडतो. ही कथा बाप्सी सिधवा यांच्या ‘क्रॅकिंग इंडिया’ या कादंबरीवर आधारित आहे. 1998 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 1947 मधील लाहोरची कहाणी सांगतो.
या चित्रपटात संपूर्ण घटना 8 वर्षांच्या पारसी मुलगी लेनीच्या नजरेतून दाखवण्यात आली आहे. तिच्या आजूबाजूच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा परिणाम तिच्या कुटुंबावर आणि मित्रांवर होतो आणि तिचं संपूर्ण जगच बदलून जातं. चित्रपटात नंदिता दास, राहुल खन्ना आणि आमिर खान यांसारखे कलाकार दिसले होते.
ट्रेन टू पाकिस्तान
पामेला रुक्स यांच्या दिग्दर्शनाखाली 1998 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ट्रेन टू पाकिस्तान’ हा चित्रपट खुशवंत सिंह यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यात पंजाबमधील काल्पनिक ‘मानो माजरा’ या गावाची कहाणी दाखवण्यात आली आहे.
या छोट्याशा गावातील हिंदू, शीख आणि मुस्लिम समुदाय अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत शांततेने राहत असतो. मात्र, फाळणी झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागते आणि त्यांच्यातील सलोखा संपत जातो.
पाकिस्तानातून भारतात येताना मारल्या गेलेल्या शीखांच्या मृतदेहांनी भरलेली ट्रेन गावात पोहोचते आणि त्यानंतर गावात हिंसाचाराची आग भडकते. एका छोट्याशा समुदायाच्या माध्यमातून फाळणीमुळे संपूर्ण उपखंडात निर्माण झालेली अस्थिरता या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
पार्टिशन: द डे इंडिया बर्नड
2007 मध्ये प्रदर्शित झालेली BBCची ‘पार्टिशन: द डे इंडिया बर्नड’ ही डॉक्युमेंट्री फाळणीच्या काळातील अनेक वास्तव घटना पडद्यावर आणते. रिकार्डो पोलॅक यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर उसळलेला मोठ्या प्रमाणावरील हिंसाचार आणि घरं सोडून स्थलांतर करण्यास भाग पडलेल्या लोकांची परिस्थिती दाखवण्यात आली आहे.
फाळणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या लोकांच्या आठवणी आणि आपबीतीच्या माध्यमातून ही डॉक्युमेंट्री एक अशी दुनिया जिवंत करते, जिथे पिढ्यान् पिढ्या एकत्र राहणारे समुदाय एका राजकीयसीमेमुळे अचानक एकमेकांपासून वेगळे झाले.