चंदीगड : राजस्थान रॉयल्सनं एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 47 धावांनी पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानच्या विजयात वैभव सूर्यवंशी यानं केलेली 97 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. वैभव सूर्यवंशीनं 29 धावांमध्ये 97 धावा केल्या. या खेळीत वैभवनं 12 षटकार आणि 5 चौकार मारले. या कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला आहे. या वादळी आणि ऐतिहासिक खेळीनंतर वैभव सूर्यवंशीनं एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरोधात वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील वेगवान शतक मारण्याचा विक्रम मोडू शकला नाही. तो विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. मात्र, एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम वैभव सूर्यवंशीनं मोडला. वैभव सूर्यवंशीनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 65 षटकार मारले आहेत.
एलिमिनेटरनंतर पहिली प्रतिक्रिया
सनरायजर्स हैदराबाद विरोधातील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्सनं जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यासह त्यानं कॅप्शन लिहिताना धावांची आणखी भूक असल्याचं म्हटलंय.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानं वैभव सूर्यवंशीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. लय भारी भावा, शानदार खेळी असं रैनानं म्हटलं. तर, मॉडेल शहनाज गिल हिनं वैभवच्या खेळीबद्दल पोस्ट करताना म्हटलं की भावा, आम्हाला तुझा अभिमान आहे.
वैभव सूर्यवंशीनं त्याच्या छोट्या आयपीएल करिअरमध्ये अनेक विक्रमांची नोंद केली आहे. 22 सामन्यांमध्ये त्यानं 932 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 2 शतकं आणि पाच अर्धशतकांची नोंद आहे. त्याच्या करिअरचं स्ट्राइक रेट 231.84 आहे. वैभवनं त्याच्या आयपीएल करिअरमध्ये चौकारांपेक्षा षटकार अधिक मारले आहेत. वैभवनं त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 89 षटकार आणि ७३ चौकार मारले आहेत.
क्वालिफायर 2 मध्ये गुजरात राजस्थान आमने सामने
एलिमिनेटर जिंकलेल्या राजस्थानचा सामना आता शुभमन गिलच्या गुजरात टायटन्स सोबत 29 मे म्हणजेच उद्या होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीत पोहोचेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवत आरसीबीनं पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अंतिम सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
आणखी वाचा