आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे


मुंबई : आपल्या कर्तव्यदक्ष आणि नियमाधीन कामकाजामुळे कायम चर्चेत असलेले वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची नुकतेच बदली झाली असून त्यांनी प्रशासकीय सेवेच्या कार्यकाकाळीत बदल्यांचे पावशतक पूर्ण केले आहे. यापूर्वी, दिव्यांग मंत्रालयाच्या आयुक्तपदावरुन ते आपत्ती व पुनर्वसन विभागात गेल्याच महिन्यात विराजमान होते, आता त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. राज्याच्या अन्न व औषध विभागाचे मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे (NCP) नेते नरहरी झिरवाळ कार्यरत आहेत. त्यामुळेच, तुकाराम मुंढेंनी मंगळवारी आपल्या नव्या विभागाचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांची भेट घेतली. 

तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय सेवेतील ही त्यांची 25 वी बदली असून दीड महिन्यांपूर्वीच त्यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत असताना आता तुकाराम मुंढेंना या खात्याची जबाबदारी देण्यात आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या धाबे दणाणले आहेत. तसेच, अवैध गुटखा माफिया, मेडिकल आणि हॉटेलवाल्यांचेही धाबे दणाणले आहेत. त्यातच, मंगळवारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या विभागाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर, मंत्री नरहरी झिरवाळ यांची मुख्यालयात जाऊन भेट घेतली. यासंदर्भात स्वत: नरहरी झिरवाळ यांनी माहिती दिली असून आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू, असेही त्यांनी म्हटलं.  

नरहरी झिरवाळ यांच्याकडून शुभेच्छा

कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुख्यालयात अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रालयात विभागाचे मंत्री म्हणून माझी सदिच्छा भेट घेतली. प्रशासकीय कार्यातील त्यांचा अनुभव, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यांचा विभागाच्या कार्यक्षमतेस निश्चितच सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास आहे. विभागाच्या प्रगतीसाठी आणि जनहिताच्या दृष्टीने आम्ही दोघेही समन्वयाने व प्रभावीपणे कार्य करू, नव्या जबाबदारीच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा, असे नरहरी झिरवाळ यांनी या भेटीनंतर म्हटले आहे.

दिव्यांग कल्याण विभागात बोगसगिरीवर कारवाई

तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात आयुक्त म्हणून काम करताना मोठी कारवाई केली होती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. तुकाराम मुंढेंची ही साफसफाईची कामं सुरू असतानाच त्यांची बदली करण्यात आली. 31 मार्च रोजी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आणि दिव्यांग विभागातील बोगस अधिकाऱ्यांवरची कारवाईही थांबली. त्यानंतर मुंढे यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मदत कार्य विभागात बदली करण्यात आली.

हेही वाचा

मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *