Randhir Singh Passes Away : भारतीय नेमबाजी विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनुभवी शूटर आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. रणधीर सिंग हे ऑलिम्पिक स्तरावरील ट्रॅप आणि स्कीट शूटर होते. आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी तब्बल पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 1978 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते भारताचे पहिले नेमबाज ठरले होते.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 1979 मध्ये अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. हा भारतातील खेळाडूंना दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.
त्यांच्या निधनाची माहिती भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनाचे सचिव राजीव भाटिया यांनी दिली. त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “अत्यंत दुःखाने आम्ही राजा रणधीर सिंह यांच्या निधनाची बातमी देत आहोत. 27 मे 2026 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”
खेळाडू म्हणून नाव कमावल्यानंतर रणधीर सिंग यांनी क्रीडा प्रशासनातही मोठी छाप सोडली. सप्टेंबर 2024 पासून ते आशिया ऑलिम्पिक परिषद (OCA) चे अध्यक्ष होते. यापूर्वी 2021 पासून त्यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
तसेच 2001 ते 2014 दरम्यान ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) चे सदस्य होते, तर 2014 नंतर त्यांना मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. 1991 ते 2015 या काळात त्यांनी OCA चे महासचिव म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली.
देशांतर्गत क्रीडा व्यवस्थापनातही त्यांचे योगदान मोठे होते. 1987 ते 2012 या कालावधीत ते भारतीय ऑलिम्पिक संघटनाचे महासचिव होते. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गव्हर्निंग बोर्डावरही त्यांनी दीर्घकाळ काम केले.
दिल्लीमध्ये 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन भारताला मिळवून देण्यात रणधीर सिंह यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्या स्पर्धेच्या आयोजन समितीचे ते उपाध्यक्षही होते. भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक मोठे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याने संपूर्ण क्रीडाविश्व हळहळ व्यक्त करत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा