उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया; ‘…धोका होता म्हणून सोडले उपोषण’; सर्वांना म्हणाले, सतर्क राहा! | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

Sonam Wangchuk: 26 दिवसांच्या बेमुदत उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण मागे घेतले. दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय झाल्याचे स्पष्ट करत, अटींबाबत लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे माहिती देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

News18
News18

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर आपले बेमुदत उपोषण मागे घेतले असून, हा निर्णय दीर्घ चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात वांगचुक यांनी उपोषण सोडले. यावेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते. त्यांच्या पत्नी गीतांजली याही त्यांच्या सोबत होत्या.

उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

शुक्रवारी उपोषण संपल्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी रुग्णालयातील बेडवरून काढलेला एक फोटोही शेअर केला. या छायाचित्रात जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर काही नेते त्यांच्यासोबत दिसत आहेत.

पोस्टमध्ये वांगचुक यांनी लिहिले

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि लेह-लडाखच्या Apex Body मधील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी अखेर २६ दिवसांनंतर माझे उपोषण सोडले.

दीर्घ चर्चेनंतर घेतला निर्णय

विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती किंवा उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्या पत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असे वांगचुक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विविध अटींवर दीर्घ चर्चा झाल्यानंतर आणि देशात संभाव्य हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या चर्चेदरम्यान कोणत्या अटींवर सहमती झाली, याबाबतचा सविस्तर खुलासा आपण लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याचे आणि लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे निरोगी होण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले

सोनमजींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या पाळावी आणि शक्य तितक्या लवकर पूर्वीचे वजन व आरोग्य पुन्हा मिळवावे, अशी माझी विनंती आहे. परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की सोनमजी निरोगी राहावेत.

28 जूनपासून सुरू होते उपोषण

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पक्ष (CJP) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, तसेच देशाच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘सोनम सर’ म्हणून लोकप्रिय

‘सोनम सर’ म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचुक या युवकांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनले होते. त्यांच्या सहभागामुळे या आंदोलनाकडे देशभरातील जनतेचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले गेले.

18 जुलै रोजी त्यांना जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळावरून हटवण्यात आले. त्यानंतर प्रथम त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. अखेर या आठवड्यात त्यांनी 26 दिवसांनंतर आपले बेमुदत उपोषण समाप्त केले.

मराठी बातम्या/देश/

उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया; ‘…धोका होता म्हणून सोडले उपोषण’; सर्वांना म्हणाले, सतर्क राहा!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *