हरारे: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हरारे येथील पहिला टी 20 सामना भारतानं जिंकला आहे. या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या. भारतानं हे आव्हान 14 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट गमावत पार केलं. वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक, इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान सहजपणे पार केलं.
अय्यरच्या नेतृत्त्वात पहिला विजय
झिम्बाब्वेनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा अपयशी ठरला. मुझरबानी यानं अभिषेक शर्माला 1 रनवर बाद केलं. टीम इंडियाचा बेबी बॉस अशी ओळख मिळालेल्या वैभव सूर्यवंशीनं झिम्बाब्वे विरोधात 18 बॉल 50 धावा केल्या. अर्धशतक झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी लगेचच बाद झाला. वैभवनं अर्धशतकी खेळीमध्ये 4 षटकार आणि 4 चौकार मारले. अर्धशतक केल्यानंतर वैभव सूर्यवंशी रिचर्ज नगरावा याच्या गोलंदाजीवर बाद झाला. ईशान किशन यानं 35 धावा केल्या तर श्रेयस अय्यर यानं नाबाद 28 धावा केल्या. तर तिलक वर्मानं 6 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्त्वात भारताचा हा पहिला विजय ठरला. यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारताचा पराभव झाला होता. आजच्या टी 20 सामन्यातील विजयासह भारत पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर परतला आहे.
भारताच्या युवा गोलंदाजांची दमदार कामगिरी
भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या आहेत. युवा गोलंदाज मयंक यादव यानं पहिल्याच बॉलवर झिम्बाब्वेला धक्का दिला. मयंक यादव, अशोक शर्मा, प्रिन्स यादव या तिघांच्या माऱ्यासमोर झिम्बाब्वेचे फलंदाज टिकू शकले नाहीत.
मयंक यादवनं पहिल्याच बॉलवर ब्रायन बेनेट याला बाद केलं. टी 20 मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा मयंक यादव हा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या या दोघांनी तीन तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. अर्शदीप सिंग यानं दोन वेळा पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आजच्या मॅचमध्ये अशोक शर्माला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, त्यानं 4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या. झिम्बाब्वेचा निम्मा संघ 64 धावांवर बाद झाला. वेसली मधेवेरे आणि तादिवानाशे मारुमानी यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळं झिम्बाब्वेला 100 धावांचा टप्पा पार करता आला.