नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या मुद्यावर नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, आज रात्री नऊच्या दरम्यान पुन्हा एकदा पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर पुन्हा राडा सुरु झाला आहे. दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची माहिती आहे.
नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन नवी दिल्लीत आंदोलक आणि दिल्ली पोलीस पुन्हा आमने सामने आले आहेत. सीजेपीनं सोमवारी संसद भवनावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे व्हिडिओ समोर आले होते. आंदोलकांकडून पोलिसांच्या वाहनांचं नुकसान केल्याचं देखील समोर आलं होतं. लाठीचार्जच्या मुद्यावरुन चर्चा सुरु असतानाच आज रात्री नऊच्या दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले आहेत. नवी दिल्लीतील आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस आणि आंदोलक यांच्यातील झटापटीत पोलीस अधिकारी विवेक भगत दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. काही आंदोलक पोलिसांच्या दिशेनं दगडफेक करत असल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलकांच्या नावाखाली समाजकटंक घुसल्याचं दिसून येत आहे. जंतरमंतरवर काही पोलिसांवर आंदोलकांवर हल्ले केले जात असल्याचं पाहायला मिळतंय. तर, पोलिसांकडून देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
सीजेपीच्या भूमिकेची प्रतीक्षा
दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनासाठी जमललेल्या आंदोलकांमध्ये समाजकंटक घुसल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीवर अद्याप कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अरविंद केजरीवाल म्हणाले की काही पत्रकारांनी आणि लोकांनी सांगितलं की जंतर मंतरवर इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, निमलष्करी दल दाखल झालं आहे. आज रात्री आंदोलन मोडीत काढलं जाऊ शकतं, असा संशय लोकांना असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. मोदीजींना सांगायचं आहे, असं धाडस करु नका. तुम्ही विचार केला होता, सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर आंदोलन संपेल. मात्र, आंदोलन खूप वाढलं. मला मोदींना सांगायचं आहे तसं धाडस करु नका. तुम्ही विचार केलेला की संसद मार्चवर लाठीमार करुन, अश्रधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलन संपवू मात्र आंदोलन वाढलं आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर