Sonam Wangchuk: …तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गेल्या 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam wangchuk) यांचे उपोषण सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणात जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी सोनम वांगचुक यांच्यासह कॉक्रोच जनता पक्षाच्या अभिजीत दीपके यांनी केली आहे. या मागणीसह सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसले होते, मात्र न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीला प्राधान्य देण्याचे निर्देश सरकारला दिल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी (Police) त्यांना जबरदस्तीने थेट रुग्णालयात दाखल केले. आता, सरकारने त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी तीन अटींवर उपोषण सोडण्यास तयार असल्याचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. 

सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “सरकारने नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पर्याप्त नुकसानभरपाई द्यावी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत संसदेत अर्थपूर्ण चर्चा व्हावी. तसेच, 20 जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संयमाने शांततापूर्ण आंदोलन केले. पोलिसांकडून झालेल्या अतिरेकी कारवाई असूनही विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आपली मागणी मांडली. या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही तरुणांवर खटले किंवा दडपशाही न करता त्यांना संरक्षण द्यावे.”, अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली आहे. 

65 खासदारांकडून उपोषण मागे घेण्याची विनंती

वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, विविध राजकीय पक्षातील सुमारे 65 खासदारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची शिक्षा किंवा खटला न भरल्याचे स्पष्ट आश्वासन दिले तरच ते उपोषण संपवतील, असे वांगचुक यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा उपोषण कायम ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे, आता सरकार काय भूमिका घेते, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करते का तेही लवकरच समजेल. 

लोकशाहीत दडपशाही नव्हे, संवादातून प्रश्न सोडवावे – अण्णा हजारे

दिल्लीतीलआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. लोकशाहीत दडपशाही नव्हे, संवादातून प्रश्न सोडवावेत, अशी भूमिका अण्णांनी पत्रातून मांडली. पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील विलंबाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थी आंदोलनाकडे कायदा-सुव्यवस्थेचा नव्हे, तर जनभावनेचा प्रश्न म्हणून पाहावे, आंदोलनकर्त्यांशी सरकारने सकारात्मक संवाद साधावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तर, महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने लोकशाही मूल्ये जपण्याचे आवाहनही अण्णांनी मोदींना केले आहे. 

हेही वाचा

…तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *