CJP Protest नवी दिल्ली : नीट यूजी परीक्षेच्या पेपरफुटीमुळं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल करुन देखील आज मोर्चाला मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले होते. आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचल्यानं संसदेची गेट बंद करण्यात आली होती. काही ठिकाणी दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांकडून लाठीचार्ज आणि अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. नवी दिल्लीतील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत बैठकांचा धडाका सुरु आहे.
सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत धर्मेंद्र प्रधान यांची बैठक आणि चर्चा देखील सुरु असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नव्या अपडेट नुसार अमित शाह यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल आणि किरण रिजिजू यांच्यासोबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेच्या नंतर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का? याची उत्सुकता देखील आहे.
केंद्रीय गृहसचिवांची बैठक
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत आंदोलनाच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गुप्तचर विभागाचे म्हणजेच IB चे प्रमुख उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सीजेपीकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी रोखलं. या संदर्भात बोलताना काँग्रेस खासदार पवन खेरा यांना लोकशाहीत विरोधी आंदोलन संसदेच्या बाहेर नाही तर कुठं जाऊन करावं? आंदोलन तिथंच होईल. तुम्ही तिथं त्यांचा आवाज ऐकू शकता, मात्र तुम्हाला जनतेचा आवाज ऐकायचा नाहीये. तुमच्या दारावर येऊन युवकांना त्यांच्या गोष्टी सांगायच्या आहोत. आमची मागणी मान्य करा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि परीक्षेत पारदर्शकता आणा, असं पवन खेरा म्हणाले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हा लोकशाहीवरील हल्ला आहे. हे सरकार सत्तेत बसण्यास पात्र नाही, असंही खरगे यांनी म्हटलं.
अभिजित दिपके याच्या कॉकरोच जनता पार्टीकडून नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांचं 21 दिवस उपोषण सुरु होतं, अखेर त्यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सीजेपीच्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. संपूर्ण देशभरातून सगळे आंदोलक दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमले आहेत.
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम