Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं? – Marathi News | Shocking Murder Body Parts in Sack at Kalyan Society, Police Probe begins


कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी अत्यंत धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. एका फ्लॅटमध्ये तुकडे करून गोणीत भरून ठेवलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पुर्वेच्या नीळकंठ सोसायटीत घडलेल्या या प्रकरामुळे नागरिक अतिशय भयग्रस्त असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. अंगावर अक्षरश: शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाची संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेच्या अडवली-ढोकळी परिसरात असलेल्या नीळकंट सोसायटीमध्ये असलेल्या एका फ्लॅटमधून गेल्या काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत होती. सुरुवातीला नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, दिवसेंदिवस ती दुर्गंधी वाढतच गेली. आणि त्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यानंतर स्थानिकांनी तत्काळ मानपाडा पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. संबंधित वृत्त समजताच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत फ्लॅटची तपासणी केली.

गोणीत भरलेला मृतदेह; तुकडे केल्याचा प्राथमिक अंदाज

फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर जे आढळलं त्याने पोलिसही अवाक् झाले. त्या फ्लॅटमध्ये पोलिसांना एका गोणीत भरलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह एका पुरूषाचा असून, त्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून घटनास्थळावरील पुराव्यांचे संकलन करण्यात आले आहे.

मृत व्यक्ती आणि महिलेची ओळख अद्याप अस्पष्ट

प्राथमिक माहितीनुसार, ही मृत व्यक्ती त्या फ्लॅटमध्ये एका महिलेसोबत राहत होती. मात्र, दोघांची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र आता ती महिला गायब आहे. ती महिला कोण कुठली, कुठे गेलीस याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं कार्यरत केली असून, तिची चौकशी केल्यावरच समोर येणारी माहिती, ही या प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरण्याची शक्यता आहे.

हत्येचे कारण अद्याप गूढ

मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरण्यामागील नेमका हेतू काय होता, हत्या नेमकी कधी झाली, गुन्ह्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

या भीषण घटनेची माहिती समोर येताच नीलकंठ सोसायटी आणि परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळ सील करून तपास सुरू ठेवला असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *