Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीत पडद्यामागे घडामोडी घडत आहेत. केंद्रात मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार? असा सवाल उत्सुकतेपोटी विचारला जातोय. तसेच ठाकरे यांचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे बळ वाढले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेचा वाटा वाढण्याही शक्यता व्यक्त केली जात आहे. आता याच शक्यता आणि चर्चेवर राज्यात मंत्री असलेले तथा शिवसेनेचे नेते गुलबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार, याचा थेट आकडाच त्यांनी सांगितला.
एखादे आंदोलन केल्याने सरकार बदलत नाही
याआधी गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे सध्या रामरक्षा आंदोलन करत आहेत. मुंबईनंतर अशाच प्रकारचे आंदोलन त्यांना नागपुरातही केले. याच आंदोलनावर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. एखादे आंदोलन केल्याने सरकार बदलत नाही. सरकार विकासावर अवलंबून असत जो विकास करेल तेच टिकेल. सध्या विकासाचे पर्व सुरू आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना लगावला. सहा खासदारांचे पक्षांतर रीतशीर झाले आहे. या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आमची खासदारांची संख्या आता 13 झाली आहे. शिवसेना मजबूत झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रात नेमके किती मंत्रिपद मिळणार?
पुढे बोलताना त्यांनी केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला चांगले स्थान मिळेल. आम्हाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिणार असल्याची माहिती आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.