72nd National Film Awards Announcements : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards 2026) शनिवारी नवी दिल्लीत अधिकृत घोषणा करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये यंदा ‘आर्टिकल 370’ (Article 370) या चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळवला आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी बॉलिवूड आणि साऊथच्या दिग्गज कलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान संयुक्तपणे जाहीर करण्यात आला असून, यामध्ये बॉलिवूडचा तरुण स्टार कार्तिक आर्यन आणि मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मामूट्टी यांनी इतिहास रचला आहे. तर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Best Marathi Cinema National Awards : ‘मु.पो. बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी पाऊलही तितकेच खंबीर पडले असून मराठी सिनेसृष्टीचा डंका पाहायला मिळाला. यामध्ये ‘मु.पो. बोंबिलवाडी’ (Mukaam Post Bonbilwadi) या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ म्हणून गौरवण्यात आले आहे. यासोबतच, नुकत्याच गाजलेल्या ‘घरत गणपती’ या चित्रपटातील ‘रंगा गंधा’ या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (Best Male Playback Singer) म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
Kartik Aaryan Mammootty Best Actor : कार्तिक आर्यन आणि मामूट्टी बेस्ट अॅक्टर
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मल्याळम सुपरस्टार मामूट्टी यांना त्यांच्या ‘ब्रमायुगम’ (Bramayugam) चित्रपटातील अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांच्यासोबतच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) चित्रपटातील त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनयासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Yami Gautam Best Actress : यामी गौतम ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
‘आर्टिकल 370’ या चित्रपटात एका धाडसी गुप्तहेर अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केले असून, या चित्रपटाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हणून गौरविण्यात आले आहे. याशिवाय, राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘श्रीकांत’ (Srikanth) चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.
तसेच, लघुपट (Short Film) विभागात अभिजीत दळवी दिग्दर्शित ‘हमसफर’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा बहुमान मिळाला आहे. मराठी कलाकारांच्या या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रातील सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे.
ही बातमी वाचा:
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम