NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक


संभाजीनगर : नीट-यूजी (NEET) निकालावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण, बीडमधील (Beed) दोन विद्यार्थ्यांनी एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवरच आरोप केले आहेत. एका विद्यार्थ्याला 522 गुण अपेक्षित असताना स्कोअरकार्डवर अवघे 95 गुण मिळाले, तर दुसऱ्या विद्यार्थिनीला 702 पेक्षा अधिक गुण अपेक्षित असताना केवळ 87 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला. या निकालानंतर पालक न्यायासाठी हायकोर्टात (court) जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा परीक्षेच्या ‘नीट’नेटकेपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

देशातील नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुन्हा नव्याने नीट परीक्षा घेण्यात आली. या री- युजी नीट परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला. देशात आणि राज्यात अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी सेलीब्रेशन सुरू झाले. मात्र, बीडच्या सोहम गवतेच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. उत्तरपत्रिका आणि अँसर की तपासल्यानंतर 522 गुण मिळतील, अशी खात्री असलेल्या सोहमच्या स्कोअरकार्डवर मात्र अवघे 95 गुण दिसले. निकाल पाहिल्यानंतर काही वेळ तो कोणाशीच बोलला नाही आणि गवते कुटुंबीयांच्या घरात अश्रूंचा बांधच फुटला.

मुलाने रात्रंदिवस अभ्यास केला, अनेकदा दोन-तीन तासांपेक्षा जास्त झोप घेतली नाही. वेळेवर जेवणही केलं नाही… आजारी पडला तरी अभ्यास थांबवला नाही. पण, निकालाने सगळ्याच मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना सोहमच्या आईने व्यक्त केली. तर, वडिलांनी ओएमआर शीट आणि अँसर की तपासल्यानंतर मोठी तफावत आढळल्याचा दावा करत, न्याय न मिळाल्यास थेट हायकोर्टात जाणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

ज्ञानेश्वरी पवारचेही स्वप्न भंगले

विशेष म्हणजे हा प्रकार एकट्या सोहमबाबतच घडला असं नाही, हे प्रकरण त्याचं एकाचं नाही. तर, बीडच्या वडवणीतील ज्ञानेश्वरी पवार हिची कहाणीही तितकीच धक्कादायक आहे. अँसर कीनुसार तब्बल 702 गुण मिळतील, या विश्वासाने एम्स दिल्लीचं स्वप्न पाहणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या स्कोअरकार्डवर मात्र केवळ 87 गुण दिसले, आणि एका क्षणात टॉपर होण्याचं ज्ञानेश्वरीचं स्वप्न चक्काचूर झालं. मुलीने वर्षभर दिवसाचे 18-18 तास अभ्यास केला, अनेकदा जेवणही टाळलं. फक्त डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवलं. पण निकालाने त्या स्वप्नांवर पाणी फेरलं, अशी व्यथा ज्ञानेश्वरीच्या आईने मांडली. ओएमआर शीटमध्ये तफावत असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांची मूळ ओएमआर शीट प्रत्यक्ष दाखवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

एनटीएच्या मुल्यांकनावरच प्रश्नचिन्ह

दरम्यान, पेपरफुटीनंतर आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट परीक्षेला आता गुणांतील कथित तफावतीची भर पडली आहे. बीडमधील दोन विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे एनटीएच्या मूल्यांकन प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का… आणि एनटीए या आरोपांवर काय उत्तर देणार… याकडे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

NEET Results: ‘नीट’चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *