NEET Paper Leak Case News : नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे. आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. अशातच आता लातूरमधून या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर येत आहे. पाचवा डॉक्टरदेखील सीबीआयच्या रडारवर असून, त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
लातूरमधील प्रसिद्ध प्रसूती रोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर आता सीबीआयच्या रडारवर
लातूरमधील प्रसिद्ध प्रसूती रोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. सीबीआयच्या पथकाने संबंधित डॉक्टरांना चौकशीसाठी लातूरमधील अस्थायी कार्यालयात आणल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात लातूरमधील पाचव्या डॉक्टरांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
सीबीआयच्या पथकाने आज दिवसभर शहरातील विविध भागात माहिती संकलन केली
यापूर्वी डॉ. मनोज शिरुरे यांच्या चौकशीनंतर एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची, त्यांच्या नातेवाईक असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांची तसेच आणखी एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ पाचव्या डॉक्टरांची चौकशी सुरू झाली आहे. सीबीआयच्या पथकाने आज दिवसभर शहरातील विविध भागात माहिती संकलन केले. काही हॉस्टेलवर जाऊन विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यानंतर काही वेळापूर्वी सीबीआयचे पथक औसा रोड परिसरातील प्रसूती रोग व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टरांच्या दवाखान्यात दाखल झाले.
काही वेळ चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित डॉक्टरांना सोबत घेत सीबीआयचे पथक लातूरमधील अस्थायी कार्यालयात पोहोचले आहे. तिथे पुढील चौकशी सुरु करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
पुन्हा एकदा सी बी आयच्या पथकाकडून मोटेगावकर यांच्या खाजगी क्लासची चौकशी
या प्रकरणाच्या तपासासाठी पुन्हा एकदा सी बी आय चे पथक मोटेगावकर यांच्या खाजगी क्लासेसमध्ये दाखल झाले आहे. तपास यंत्रणेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात असल्याचे समजते. नातेवाईकांपैकी कोणाचा पेपर फुटी मध्ये सहभाग होता का? याबाबतही तपास सुरू आहे. मोटेगावकर यांच्या नातेवाईकांचा आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग होता का? तसेच पैशांची गुंतवणूक आणि व्यवहारांची साखळी काय होती याचा तपास सीबीआयकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या कारवाईमुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आणखी व्यापक होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे…
आणखी वाचा