Last Updated:
डीआरआय मुंबईच्या पथकाने १५ आणि १६ जुलैच्या मध्यरात्री विमानतळ परिसरात सापळा रचला होता. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने एक मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन गोल्डन कॅरोसेल’ अंतर्गत अत्यंत गुप्तपणे आखलेल्या या मोहिमेत सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या कारवाईत डीआरआयने सुमारे ७.४९ कोटी रुपयांचे ५.१ किलो तस्करीचे सोने जप्त केले असून, एकूण ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मध्यरात्री रचला सापळा
डीआरआय मुंबईच्या पथकाने १५ आणि १६ जुलैच्या मध्यरात्री विमानतळ परिसरात सापळा रचला होता. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. हे कर्मचारी तस्करीचे सोने विमानतळाबाहेर घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच डीआरआयने त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ५.१ किलो सोने हस्तगत करण्यात आले, ज्याचे बाजारमूल्य ७ कोटी ४९ लाख रुपये आहे.
चौकशीतून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा
ताब्यात घेतलेल्या दोन्ही विमानतळ कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीवरून सोन्याच्या या संघटित तस्करीचा संपूर्ण उलगडा झाला. या माहितीच्या आधारे डीआरआयने तातडीने पुढील पावले उचलत विमानतळावरील आणखी एका कर्मचाऱ्याला आणि तीन परदेशी ट्रान्झिट प्रवाशांना अटक केली. अटक करण्यात आलेले तिन्ही परदेशी प्रवासी फिलिपिन्सचे नागरिक आहेत.
बँकॉक अन् दुबई कनेक्शन
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तिन्ही फिलिपिन्सचे प्रवासी बँकॉक आणि दुबईहून तस्करीचे सोने घेऊन मुंबईत आले होते. ते केवळ ट्रान्झिट प्रवासी म्हणून मुंबईत उतरले होते. विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी केली होती. या कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच हे सोने विमानतळाबाहेर काढण्याची योजना आखण्यात आली होती. ट्रान्झिट प्रवाशांचा मोहरा म्हणून वापर करून अतिशय संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही तस्करी सुरू असल्याचा दावा डीआरआयने केला आहे.
Mumbai,Maharashtra
