Last Updated:
अमृतसरहून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स एक्स्प्रेस उभी होती. नेहमीप्रमाणे एक्स्प्रेस यार्डामध्ये आली आणि स्वच्छतेचं काम सुरू झालं.
मुंबई: मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर एका एक्स्प्रेसमध्ये एका माणसाचा तुटलेला पाय आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमृतसर–CSMT एक्स्प्रेसच्या स्वच्छतेदरम्यान हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरहून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स एक्स्प्रेस उभी होती. नेहमीप्रमाणे एक्स्प्रेस यार्डामध्ये आली आणि स्वच्छतेचं काम सुरू झालं. पण, अचानक स्वच्छता सुरू असताना कर्मचाऱ्यांना एक मानवी पायाचा तुकडा आढळला. M-2 डब्याखाली गुडघ्याखालील पाय सापडल्याने खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती तातडीने रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांंना दिली. CSMT सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मानवी अवयव सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवला आहे. हा अवयव कोणाचा? गाडीत कसा आला? याचा GRP कडून तपास सुरू आहे.
दरम्यान, अमृतसरवरून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर ही एक्स्प्रेस दाखल झाली होती. या अमृतसर एक्सप्रेसच्या दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम सुरू होतं. त्यावेळी या अमृतसर एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीचा पाय आढळून आला. गुडघ्यापासून तुटलेला हा पाय होता. त्यानंतर त्याची माहिती जीआरपीला देण्यात आली. या माहितीनुसार, जीआरपी आणि आरपीएफच्या माध्यमातून तपास केला जात आहे. अमृतसर एक्सप्रेसच्या संपूर्ण प्रवासादरम्यान कुठे अपघाताची नोंद झाली होती का, याची माहिती तपासली जात आहे. याशिवाय, मार्गावरील विविध रेल्वे विभागांशी संपर्क साधून कोणतीही बेपत्ता व्यक्ती किंवा रेल्वे अपघाताची घटना घडली आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला रेल्वे ट्रॅक ओलांडताना अपघात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, हा प्रकार नेमका कोणत्या स्थानकादरम्यान घडला, संबंधित व्यक्ती कोण आहे, आणि हा अवयव गाडीत कसा अडकला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित व्यक्तीची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी GRP कडून सखोल तपास सुरू आहे.
Mumbai,Maharashtra
Mumbai: अमृतसरहून एक्स्प्रेस आली, यार्डात स्वच्छता सुरू होती अन् आढळला गुडघ्यापासून तुटलेला पाय, CSMT टर्मिनल्सवर खळबळ
