पालघरमध्ये वीज महावितरणचा भोंगळ कारभार; विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

काम करत असताना या जिवंत विद्युत वाहिनीचा त्यांना अनपेक्षितपणे स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने अशोक गोवारी यांचा जागीच मृत्यू झाला.

News18
News18

पालघर: महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या अक्षम्य आणि भोंगळ कारभारामुळे आणखी एक बळी गेला आहे. शेतात पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीचा (वायर) स्पर्श झाल्याने एका 55 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या हलगर्जीपणाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक विठ्ठल गोवारी (वय 55 वर्ष) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. ते पालघरमधील कोळगाव वनकास पाडा येथील रहिवासी होते. नेहमीप्रमाणे अशोक गोवारी हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र, शेतात महावितरणची एक उच्च दाबाची वीज वाहिनी तुटून पडली होती, ज्यामध्ये वीजप्रवाह सुरूच होता. काम करत असताना या जिवंत विद्युत वाहिनीचा त्यांना अनपेक्षितपणे स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने अशोक गोवारी यांचा जागीच मृत्यू झाला.

महावितरण विरोधात ग्रामस्थांचा आक्रोश

या घटनेची माहिती मिळताच कोळगाव वनकास पाडा परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. महावितरणच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळेच अशोक गोवारी यांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेकदा तक्रार करूनही महावितरणच्या धोकादायक वाहिन्यांची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या याच हलगर्जीपणामुळे आज एका निष्पाप शेतकऱ्याचा नाहक बळी गेला आहे, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.या दुर्दैवी घटनेनंतर पीडित शेतकरी कुटुंबाला तात्काळ आर्थिक भरपाई देण्यात यावी आणि दोषी महावितरण अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

पालघरमध्ये वीज महावितरणचा भोंगळ कारभार; विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *