Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची घेतली भेट


Koel Mallick: तृणमूल काँग्रेसच्या खासदार कोयल मल्लिक यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. कोयल मल्लिक या एक लोकप्रिय टॉलीवूड अभिनेत्री आहेत. त्यांचा राजीनामा हा पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. बुधवारी, पक्षाचे नेते मदन मित्रा यांनीही ममता बॅनर्जी यांचा पक्ष सोडून ऋतब्रता गटात प्रवेश केला होता. आज खासदार कोयल मल्लिक यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्या कोएल मलिक यांनीही केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आहे.

कोयल मल्लिक यांचे खरे नाव रुक्मिणी मल्लिक आहे. त्या एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री असून, टॉलीवूडची ‘टॉली-क्वीन’ म्हणून त्या ओळखल्या जातात. राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना लिहिलेल्या पत्रात कोयल मल्लिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. “कृपया तो स्वीकारावा,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी राज्यसभेतील सर्व अधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले. कोयल मल्लिक यांनी 3 एप्रिल रोजी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली होती. आज, 16 जुलै रोजी, 101 दिवसांनंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. कोयल मल्लिक यांच्या राजीनाम्याचे कारण उघड झालेले नाही, तसेच त्यांनी राज्यसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रातही त्याचा उल्लेख केलेला नाही.

चार राजसभा खासदारांचा राजीनामा

कोयल मल्लिक यांच्या राजीनाम्यामुळे, राज्यसभेतून राजीनामा देणाऱ्या टीएमसी खासदारांची संख्या चार झाली आहे. यापूर्वी सुखेंदू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बाराईक यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. आता या यादीत कोयल मल्लिक यांच्या नावाचीही भर पडली आहे. मात्र, त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, सुखेंदू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बाराईक यांच्या राजीनाम्यानंतर कोयल मल्लिक यांच्या राजीनाम्याची बातमी पसरली होती. ही बातमी नंतर खोटी असल्याचे निष्पन्न झाले असले तरी, बंगालच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चा कायम होती. आणि आता कोयल मल्लिक यांनी राजीनामा दिला आहे. पूर्वी राज्यसभेत तृणमूलचे 13 सदस्य होते, पण चौघांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे खासदारांची संख्या आता नऊ झाली आहे.

सुखेंदू शेखर, सुष्मिता आणि प्रकाश चिक बराईक यांसारख्या नेत्यांनी केवळ राज्यसभेचाच नव्हे, तर पक्षाच्या सर्व पदांचाही राजीनामा दिला होता. त्यांनी पक्षाबद्दल आपला संताप व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. या तिघांनीही भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुन्हा राज्यसभेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बंगालच्या राजकारणात अशी चर्चा आहे की कोयलही त्यांचेच अनुकरण करू शकतात. राजीनामा दिल्यानंतर त्या दिल्लीत भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी दिसल्या होत्या. यामुळे त्या भाजपमध्ये सामील होऊ शकतात या अटकळांना बळ मिळाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *