Last Updated:
Sayaji Shinde on Sonam Wangchuk Hunger strike: सोनम वांगचुक गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. याच गंभीर परिस्थितीवर आता मराठी व दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे.
मुंबई: सध्या प्रसिद्ध पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांच्या काळजीने संपूर्ण देश हळहळत आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील नीट पेपर फुटीच्या घोटाळ्याविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सोनम वांगचुक गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, जर हे उपोषण आणखी काही दिवस सुरू राहिले, तर वांगचुक यांच्या जिवावर बेतू शकते. याच गंभीर परिस्थितीवर आता मराठी व दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे.
सयाजी शिंदेंनी सरकारला सुनावले खडे बोल
आमीर खानच्या ‘३ इडियट्स’ सिनेमातील ‘रॅन्चो’ हे पात्र ज्यांच्या खऱ्या आयुष्यावरून प्रेरित होते, तेच हे सोनम वांगचुक आहेत. याचाच संदर्भ देत सयाजी शिंदे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, “तुम्हाला मंत्री पद सोडायचे नाहीये, तुम्ही नका सोडू. पण सोनम वांगचुक यांना उपोषणापासून तरी सोडवा. सिनेमातील रॅन्चोसाठी तुम्ही एवढा जीव लावला पण खऱ्या आयुष्यातील रॅन्चोसाठी तुम्ही काहीच का नाही बोलत आहात. सोनम वांगचुक देशासाठी फार महत्त्वाचे आहेत. माझी तर आहेच पण सगळ्या क्षेत्रातील समजदार माणसांनी सोनम वांगचुक यांना विनंती करावी. सरकारने ताबडतोब मध्यस्थी करावी.”
सयाजी शिंदेंनी पुढे आवाहन केले की, केवळ मीच नाही, तर देशातील प्रत्येक क्षेत्रातील सुजाण आणि समजदार नागरिकांनी आता एकत्र येऊन वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली पाहिजे, कारण हा माणूस देशासाठी अत्यंत मोलाचा आहे.
संपूर्ण सिनेसृष्टी सोनम वांगचुक यांच्या काळजीत
सयाजी शिंदे यांनी केवळ सरकारलाच सुनावले नाही, तर सोनम वांगचुक यांनाही आपला लढा जिवंत ठेवण्यासाठी तब्येतीची काळजी घेण्याची भावनिक साद घातली आहे. सयाजी शिंदे हे स्वतः वृक्षारोपण आणि अनेक सामाजिक चळवळींमध्ये नेहमी सक्रिय असतात. सोनम यांनीही त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यामुळे वांगचुक यांच्या वेदना त्यांना जास्त जवळून जाणवल्या आहेत. यापूर्वी मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याची आठवण करून दिली होती.
आंदोलनाचा १८ वा दिवस आणि वाढता तणाव
दिल्लीतील या उपोषणाला आता जवळपास अडीच आठवडे पूर्ण होत आले आहेत. वांगचुक यांच्यासोबत अनेक तरुण विद्यार्थीही तिथे आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वांगचुक यांचे सुरक्षित राहणे गरजेचे आहे. आता कलाविश्वातून उमटणाऱ्या या तीव्र प्रतिक्रिया आणि सयाजी शिंदेंनी सरकारला सुनावलेले खडे बोल पाहता, प्रशासन अखेर या आंदोलनात मध्यस्थी करणार का, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.
Mumbai,Maharashtra
‘तुम्हाला तुमचं मंत्रीपद सोडायचं नसेल…’, सोनम वांगचुक यांच्यासाठी सयाजी शिंदें आक्रमक, सत्ताधाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलं
