जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल
Jayant Patil on Meeting With CM Fadnavis: एक राजकीय घटनाक्रम आणि योगायोग गेल्या काही दिवसात क्रमबद्ध पद्धतीने घडत असल्याने राजकीय भूकंप होणार असल्याचे दावे समोर येत आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची एक आठवड्यापूर्वी भेट झाली. त्यानंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यानंतर काल जयंतराव पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर चर्चेसाठी एकत्र आल्याची बातमी समोर आली. यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादीचे विलिनीकरण होऊन NDA शी घरोबा करण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. आज पत्रकार परिषद घेत जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काय घडलं याची इनसाईड स्टोरी सांगितली.
नेमकं काय घडलं?
ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचा मुद्दा घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. यावेळी फडणवीसांनी विचारलं काय झालं. मी नगराध्यक्षांचा मुद्दा सांगितला. ते माहिती घेतो म्हणाले. त्या आधी मी एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. ते दिल्लीत होते. त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी सीएमला भेटलो. त्यांनाही सांगितलं. एक पाच दहा मिनिटे भेटलो आणि बाहेर आलो. मी हॉलमध्ये बसलेलो होतो. ते बऱ्याच वेळाने आले. सीएम म्हणाले, गडबड सुरू आहे. मिटिंग सुरू आहे. ते म्हणाले काय आहे. मी माहिती दिली. ते म्हणाले, मी दोन दिवसात माहिती घेऊन सांगतो. आम्ही अपील करणार असल्याचं सांगितलं. नगरविकास मंत्र्यांकडे अपील करावं लागतं. पण नगरविकास मंत्री नव्हते, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
तटकरे आणि पटेलांसोबत भेट?
मी हॉलमध्ये एकटाच होतो. बऱ्याच वेळाने सीएम बाहेर आले. तिथे तटकरे आले माहीत नाही. आतमध्ये कोणाशी चर्चा करत होते हे माहीत नाही. मी घरी आल्यावर फुटबॉलची मॅच पाहत होतो. त्यावेळी अशा बातम्या सुरु असल्याचे मेसेज आले. म्हटलं सकाळीच बोलू. म्हणून आता बोललो, असे सांगत जयंत पाटील यांनी सुनील तटकरे आणि पटेलांसोबतच्या भेटीचे वृत्त फेटाळले. पटेल आणि तटकरे हे तिथे हजर असल्याचे आपल्या गावी नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. पण माध्यमांनी सतत या भेटीवरून योगायोग घडत असल्याबाबत विचारल्यावर त्यांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली आणि या चर्चांवर कानावर हात ठेवले.