लग्नात डान्स का केला नाही? अस्मिताला इतकं छळलं की, ‘मृत्यू’नेच केली सुटका, कोल्हापूरच्या ‘त्या’ प्रकरणात शॉकिंग खुलासा | कोल्हापूर बातम्या


Last Updated:

Kolhapur News: अस्मिता गरोदर राहिल्यानंतर तिला मुलगा व्हायला हवा, अशी साससरच्या लोकांची इच्छा होती. बाळाच्या जन्माआधीच त्यांनी मुलगा म्हणून कपड्यांची खरेदी केली होती.

लग्नात डान्स का केला नाही? अस्मिताला इतकं छळलं की, ‘मृत्यू’नेच केली सुटका, कोल्हापूरच्या ‘त्या’ प्रकरणात शॉकिंग खुलासा
लग्नात डान्स का केला नाही? अस्मिताला इतकं छळलं की, ‘मृत्यू’नेच केली सुटका, कोल्हापूरच्या ‘त्या’ प्रकरणात शॉकिंग खुलासा

कोल्हापूर: कौटुंबिक छळातून विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कोल्हापूर हादरलं. आता अस्मिता काटकर खून प्रकरणात रोज नवे खुलासे होत असून सासरच्या मंडळीकडून झालेल्या छळाची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अस्मिताच्या लग्नानंतर सासरच्यांकडून पैसे, प्रथा-परंपरा आणि मुलगी झाल्याने वारंवार छळ करण्यात आला. तसेच तिच्या भावाला देखील तिला कधीच भेटू दिलं नसल्याचा आरोप तिची आई संगीता सरदेसाई यांनी केला आहे.

नेमकं घडलं काय?

संगीता सरदेसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि प्रतीकसिंह काटकर यांचा 26 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापुरात विवाह झाला. लग्नात सासरच्या लोकांनी अस्मिताने डान्स करावा म्हणून खूप आग्रह केला. मात्र, तिने डान्स केला नव्हता. याच रागातून अस्मिताने केवळ आम्हालाच नाचवले म्हणून सासू, पतीसह सासरची मंडळी तिचा वारंवार छळ करत होती. तसेच माहेरहून सारखी पैशांची मागणी देखील केली जात होती.

मुलगी झाल्याने टोमणे वाढले

पुढे अस्मिता गरोदर राहिल्यानंतर तिला मुलगा व्हायला हवा, अशी सासरच्या लोकांची इच्छा होती. बाळाच्या जन्माआधीच त्यांनी मुलगा होणार म्हणून अगदी कपड्यांचीही खरेदी केली. मात्र, मुलगी झाल्याने पुन्हा अस्मिताचा छळ सुरू झाला. सासरच्या नातेवाईकांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली.

बारशावरून पुन्हा वाद

दरम्यान, मुलीचं बारसं कधी घ्यायचं यावरून दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. बारशाला पाळणा खरेदीसाठी पती प्रतीकसिंह याने 50 हजारांची मागणी केली. तसेच 15 ऑगस्टलाच बारसे घेण्याचा आग्रह केला. परंतु, आर्थिक चणचण असल्याने बारसे पुढे ढकलावे, अशी विनंती अस्मिताच्या आई-वडिलांनी केली होती. मात्र, सासरच्यांनी ऐकलं नाही. शेवटी अस्मिताच्या आईने गळ्यातील दागिने गहाण टाकून पाळण्यासाठी 40 हजार रुपये दिले. तसेच आम्ही सांगेल त्याच हॉलमध्ये बारसे झाले पाहिजे, असा आग्रहही त्यांनी सुरू केला होता.

अस्मिताचं टोकाचं पाऊल

सततचे टोमणे, त्रास, प्रथा, परंपरा आणि माहेरहून पैशांची मागणी याला अस्मिता कंटाळली होती. घरात बारशाची तयारी आणि त्यातून तणाव होता. त्यामुळे तिने यातून कायमची सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी केलेल्या छळामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप आई संगीता सरदेसाई यांनी केला आहे.

याप्रकरणी अस्मिता हिचा पती, सासू, सासरा आणि नणंदेवर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर (30), सासू मनीषा काटकर (51), सासरा वीरेंद्रसिंह काटकर (58), नणंद ऋतुजा काटकर (25) अशी आरोपींची नावे आहेत. राजारामपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *