या तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार… शिंदे सेनेला दोन मंत्रीपदं… चार्टड विमानाने खासदार आजच जाणार दिल्लीला, कुणाला लॉटरी? – Marathi News | Jackpot for the Eknath Shinde Shiv Sena in the Union Cabinet Shrikant Shinde cabinet expansion on 17 July Minister of State post Six split MP Omraje Nimbalkar Sanjay Jadhav Sanjay Deshmukh


या तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे समजते. ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची बैठक होणार आहे. तर चार्टड विमानाने खासदार (Eknath Shinde Shivsena Central Cabinet) आजच दिल्लीला रवाना होणार असल्याचे समजते.

शिवसेनेच्या खात्यावर दोन मंत्रिपदं

केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेटमंत्री व राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पद दिले जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. तर राज्यमंत्री पदासाठी नव्याने आलेल्या ६ खासदारांमध्ये रस्सीखेच असल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

17 तारखेला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार

17 तारखेला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांना चार्टड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे असे समजते.

6 खासदारांमध्ये कुणाची वर्णी?

ठाकरे सेनेतून 6 खासदार शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. यातील एकाची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यात केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत दौऱ्यात कुणाच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोषाची तयारी केल्याची माहिती आहे. तर उर्वरीत चार खासदारांना कोणत्या समितीवर घेण्यात येते याचीही चर्चा रंगली आहे.

दरम्यान या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळणार की नाही याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारात सहभागाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाले नसल्याचे समोर येत आहे. एनडीएत सहभागी झाल्यापासून पक्षाने राज्यमंत्री पदाऐवजी कॅबिनेटची मागणी लावून धरलेली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *