NCP Sunetra Pawar and Sachidanand singh: सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड अवैध असून त्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवून जाब विचारणारे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह (Sachidanand singh) यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे. मी तीन महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. मात्र, ते पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वाकडून गांभीर्याने घेण्यात आले नाही आणि मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिणामी मी सुनेत्रा पवार यांच्या निवडीविरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. आता न्यायालयाने सुनेत्रा पवार यांची निवड योग्य असल्याचा निर्वाळा दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही. मी आता याप्रकरणात कोणीही वैयक्तिक चर्चा केली तरी माझ्या निर्णयापासून ढळणार नाही, असे सच्चिदानंद सिंह यांनी सांगितले. (Maharashtra Politics news)
मी सुनेत्रा पवार यांना पार्टीचा सर्वोच्च नेता मानतो. मात्र, पक्षाच्या मुंबईतील राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची निवड झाली, ते पक्षाच्या घटनेविरोधात होते. अजित पवार यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाची निर्मिती झाली. त्याबाबत निवडणूक आयोगाला कळवण्यात आले होते. पक्षाच्या घटनेतील बायलॉजनुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करताना आधी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली पाहिजे, हे ठरवते. त्यानंतर आम्ही सर्वसंमतीने नावाचा ठराव मंजूर करतो. ते नाव राष्ट्रीय अधिवेशनात मांडले जाते आणि त्याला अनुमोदन दिले जाते. अशाप्रकारे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाते. मात्र, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करताना या प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे भविष्यात संकट येऊ शकते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. अशावेळी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत त्रुटी राहिल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सच्चिदानंद सिंह यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीतील त्रुटी दूर होणे गरजेचे आहे. मी कायदेशीर नोटीस पाठवण्यामागे कोणतेही राजकारण नाही. नैसर्गिक न्यायाचा माझा आग्रह आहे. सुनेत्रा पवार यांची निवड होताना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली नाही. मी या चुका सुधारण्यासाठी पत्र पाठवले, पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही, असेही सच्चिदानंद सिंह यांनी म्हटले.
आणखी वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से