BMC: पालिकेनं फोडलं कंत्राटदारावर खापर! 11 वर्षांच्या विहानच्या मृत्यूची किंमत 5 लाख?; BMC कडून स्वत:च्या विभागांना क्लिन चिट! | मुंबई बातम्या (Mumbai News)


मुंबईमध्ये ३० जून रोजी पहिल्याच पावसाने हजेरी लावली. चेंबूरमध्ये एका शाळेच्या व्हॅनवर झाडं कोसळलं. या दुर्घटनेमध्ये विहान  श्रीवास्तव या ११ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. विहानच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पालिकेच्या कारभारावर विरोधकांनी जोरदार टीका केली.  मुंबई पालिकेनं या प्रकरणी चौैकशी समिती स्थापन केली होती. आता चौकशी समितीनेही ११ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला कंत्राटदारलाच जबाबदार धरलं आहे. या घटनेप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर केला आहे.

३० जून २०२६ रोजी चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड पडल्याप्रकरणी चौकशी समितीने अहवाल सादर झाला आहे., उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळला नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.  झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसावी, त्यामुळे त्याला ५ लाख रुपये दंड करण्याची शिफारस या अहवालात केली आहे. तर कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला (कन्सल्टंट) २ लाख रुपये दंड करण्याची शिफारसही केली आहे.  दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असंही या अहवालात नमूद केलं आहे.

कोण आहे समितीमध्ये?

चेंबूर पश्चिम परिसरात शाळेच्या बसवर दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याने झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई महागनरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठीत केली होती. या समितीने उद्यानविद्या व लॅण्डस्केप सल्लागार रॉबर्ट फर्नांडिस यांच्या सोबत दिनांक ३ जुलै २०२६ रोजी घटनास्थळाची संयुक्त पाहणी करून सविस्तर अहवाल तयार केला आहे.

चौकशी समितीने मांडलेले निष्कर्ष 

१. आपत्ती व्यवस्थापन व मदत नोंदणी केंद्र यांच्या दिनांक २ जुलै २०२६ रोजीच्या माहितीनुसार चेंबूर येथील घटनास्थळावरील पावसाबाबात दिनांक २८ जून २०२६ रोजी सरासरी ६२.८० मिलिमीटर, दिनांक २९ जून रोजी सरासरी ७१.६ मिलीमीटर व दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत म्हणजेच झाड पडण्याच्या घटनेवेळी १३.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तसेच सदर झाड उन्मळून पडण्याच्या वेळी ताशी २५.७ प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. आपत्कालिन व्यवस्थापन कक्ष यांच्याकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दिनांक २८ जून २०२६ ते दिनांक ५ जुलै २०२६ या अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये मुंबई शहरात सुमारे १ हजार १५८ झाडे/फांद्या पडल्या आहेत. ही झाडे केवळ रस्त्यांच्या दुतर्फा असलेली नसून, यामध्ये सोसायटी, उद्याने, मोकळे भूखंड, मोकळ्या जागांवरील झाडांचाही यामध्ये समावेश आहे.

२. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने वेळोवेळी संबंधित परिसराची पाहणी केली. मान्सूनपूर्व झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी केली. तसेच, चेंबूर (प) येथील संबंधित झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान काम सुरू होते. या कामांबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला वेळोवेळी कळविले होते. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी घडलेल्या दुर्घटनेमध्ये उद्यान विभागाचा कोणताही दोष सकृतदर्शनी दिसून येत नसल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.

३. अस्तित्वात असलेल्या झाडालगत पर्जन्यवाहिनीचे काम करताना सदर झाड पर्जन्यवाहिनीत असल्याचं समोर आलं. त्यामुळे पर्जन्यवाहिनी बाधित होत होती. पर्यायाने तिथे पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी पर्जन्य जलवाहिनीची सातत्यता (continuity) ठेवण्यासाठी आणि सदर झाड वाचविण्यासाठी झाडाचे परिघ सोडून रस्ते विभागाने सुरक्षित अंतर ठेवून पर्जन्य जलवाहिनीचे बांधकाम केले. जेणेकरुन सदर ठिकाणी पर्जन्यजलवाहिनीचे पाणी तुंबणार नाही. यास्तव, रस्ते विभागाने योग्य ती काळजी सदर प्रकरणी घेतल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी घडलेल्या दुर्घटनेस रस्ते विभागाचा देखील कोणताही दोष सकृतदर्शनी दिसून येत नाही, असे चौकशी समिती अहवालात म्हटलं आहे.

४. उद्यान विभागाने झाडांच्या सुरक्षिततेबाबत रस्ते विभागाला दिनांक ९ एप्रिल २०२५ व दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी कळविले होते. त्यानुसार रस्ते विभागाने याबाबत संबंधित कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सूचित केल्यानुसार कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे सकृतदर्शनी आढळून येते. तथापि, वनस्पतीशास्त्र/उद्यानशास्त्र तज्ज्ञ, उद्यानविद्या व लॅडस्केप सल्लागार यांनी संबंधित झाड पडल्याबाबत त्यांच्या अहवालात विषद केलेली विविध कारणे आणि सदर झाड पडल्यापासून म्हणजेच दिनांक २८ जून २०२६ ते दिनांक ५ जुलै २०२६ या कालावधीत मुंबईमधील विविध रस्त्यांवरील तसेच उद्यानातील मोकळ्या जागांवरील सुमारे १ हजार १५८ झाडे/फांद्या देखील पडल्याच्या अनेक घटना घडल्या.

ही बाब समितीने विचारात घेतली आहे. त्यामुळे कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना पूर्णपणे दोषी धरणे उचित होणार नाही. तथापि, मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना रस्ते विभागाने झाडाजवळील उत्खनन करताना काळजी घेण्याबाबत तसेच सदर काम करताना कोणतीही घटना किंवा नुकसान झाल्यास त्या सर्व परिणांमासाठी कंत्राटदार पूर्णपणे जबाबदार आणि उत्तरदायी असेल असे पत्र पाठविले होते. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. तथापि, वनस्पतीशास्त्र/उद्यानशास्त्र तज्ज्ञ यांच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे झाड पडण्याबाबतच्या विविध संभाव्य कारणांपैकी, कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे एक कारण असू शकते. यास्तव, कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ५ लाख रुपयांचा दंड करण्याचे समितीने अहवालात प्रस्तावित केले आहे.

५. रस्ते विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार सदर कामावर परिपूर्ण देखरेख व निरीक्षण तसेच तांत्रिक पर्यवेक्षणासाठी मे. माहिमतुरा कंन्सलटंट यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या व्याप्तीनुसार त्यांनीही वेळोवेळी कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देऊन झाडांची स्थैर्यता (stability) अबाधित राखणे गरजेचे होते. तथापि, अहवालात नमूद केल्याप्रमाणे झाड पडण्याबाबतच्या विविध संभाव्य कारणांपैकी, कन्सलटंट यांनी पुरेशी खबरदारी न घेणे हे एक कारण असू शकते व कंत्राटदाराच्या सदर कामावर पुरेशी देखरेख ठेवून त्यातील त्रुटी निदर्शनास आणून देण्याची खबरदारी मे. माहिमतुरा कन्सलटंट यांनी घेणे गरजेचे होते. यास्तव, मे. माहिमतुरा कंन्सलटंट यांनाही २ लाख रुपयांचा दंड करण्याचे समितीने प्रस्तावित केले आहे.

भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून तब्बल २५ उपाययोजना

१. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर पात्र तज्ज्ञांच्या बहुविद्याशाखीय समितीद्वारे (multidisciplinary panel) झाडांच्या जोखमीचे वेळोवेळी मूल्यांकन (Tree Risk Assessment) करण्यात यावे.

२. रस्त्यांच्या कडेला असलेल्या सर्व झाडांची ‘जीआयएस’ (GIS) आधारित सूची तयार करून ती अद्ययावत ठेवावी. यामध्ये झाडांची प्रजाती, वय, आकार, आरोग्य स्थिती, देखभालीचा इतिहास आणि तपासणीच्या नोंदी असाव्यात.

३. उत्खनन आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांदरम्यान, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली वैज्ञानिक पद्धतीने झाडांच्या मुळांचे रक्षण करावे. जेथे मुळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळणे अशक्य असेल, तेथे बाधित झाडांचे योग्य मोकळ्या जागेत पुनर्रोपण (transplantation) करण्याचा विचार करावा. भविष्यात रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करताना, उपलब्ध जागेचा विचार करून योग्य आकाराच्या व कमी उंचीच्या स्थानिक (native) झाडांच्या प्रजातींना प्राधान्य द्यावे.

४. झाडांच्या मुळांच्या आरोग्यासाठी, हवेच्या सुलभ हालचालीसाठी (aeration) आणि जमिनीत पाणी जिरण्यासाठी ‘क्रिटिकल रूट झोन’ (मुख्य मूळ क्षेत्र) मध्ये पुरेशी पाणी शोषून घेणारी (permeable) माती राखून, झाडांच्या बुंध्याभोवती होणारे अतिरिक्त काँक्रिटीकरण कमीत कमी करावे.

५. प्रशिक्षित आणि प्रमाणित कर्मचाऱ्यांद्वारेच झाडांची शास्त्रीय छाटणी (scientific pruning) केली जावी. झाडाचा संरक्षणात्मक समतोल सुधारण्यासाठी, वाऱ्याचा रोध कमी करण्यासाठी आणि झाडावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी, जेथे आवश्यक असेल तेथे वेळोवेळी फांद्यांची वरील छाटणी (crown reduction) करावी; विशेषतः नुकत्याच बांधलेल्या काँक्रिट रस्त्यांच्या शेजारील झाडांसाठी हे आवर्जून केले पाहिजे.

६. रस्ते बांधणी आणि पायाभूत सुविधा (infrastructure) प्रकल्पांदरम्यान, अभियांत्रिकी (Engineering), रस्ते (Roads), पर्जन्य जलवाहिनी (SWD), उद्यान (Garden) आणि उपयुक्तता सेवा (Utility) विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका समर्पित नोडल अधिका-याची नेमणूक करावी, जेणेकरून संपूर्ण प्रकल्प अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीतील झाडांचे योग्य संरक्षण सुनिश्चित होईल.

७. मुसळधार पाऊस, चक्रीवादळ किंवा तीव्र वादळाच्या घटनांनंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या/पूर्ण वाढ झालेल्या झाडांची त्वरित पाहणी करावी आणि जेथे आवश्यक असेल तेथे योग्य सुधारात्मक किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू कराव्यात.

८. शहरी झाडांची पाहणी, देखभाल, छाटणी आणि सहामाही सुरक्षा लेखापरीक्षणासाठी (half-yearly safety audits) एक ‘प्रमाणित कार्यपद्धती’ (Standard Operating Procedure-SOP) विकसित करून ती लागू करावी. या पाहणी अहवालांचे पुनरावलोकन आणि प्रमाणीकरण संबंधित विभाग प्रमुखांनी एका स्वतंत्र वृक्ष तज्ज्ञासोबत (independent tree expert) एकत्र येऊन करावे.

९. शहरी रस्त्यांच्या कडेला, जेथील जागा व परिस्थिती योग्य / अनुरुप असेल तिथे, पूर्ण वाढ झाल्यावर साधारणपणे १५-२० फूट उंची गाठणाऱ्या योग्य स्थानिक (native) वृक्ष प्रजातींच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे; ज्यामुळे पर्यावरणीय फायदे टिकून राहतील आणि भविष्यात पायाभूत सुविधांशी होणारा अडथळा कमी होईल.

१०. शैक्षणिक मोहिमांद्वारे सार्वजनिक जनजागृती बळकट करावी आणि शहरी वृक्ष व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या प्रमाणित कंत्राटदारांना, पर्यवेक्षकांना (supervisors) आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना नियमित प्रात्यक्षिक प्रशिक्षण द्यावे. गुणवत्ता नियंत्रण (quality control) आणि उत्तरदायित्व (accountability) सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट वृक्षसंवर्धन कामांचे उपकंत्राट (subcontracting) देणे कमीत कमी करावे.

११. झाडांच्या मुळांची व्याप्ती ही झाडांच्या वरील डोलाऱ्याच्या योग्य प्रमाणात असावी. ज्यामुळे झाडाच्या डोला-याला व्यवस्थित आधार मिळू शकेल व झाड पडणार नाही.

१२. उद्यान विभागात अस्तित्वात असलेल्या कर्तव्य सूचीमध्ये कर्तव्य नमूद केलेले आहे. सदर कर्तव्य सूचीमध्ये प्रत्येक झाडाला न्याय देण्यासाठी त्याचे निरीक्षण व पुढील काळजी घेण्यासाठी योग्य वेळ उपलब्ध होऊ शकत नाही असे उद्यान विभागाच्या निवेदनामध्ये सादर केलेले आहे. यावर उपाययोजना म्हणून मुख्य अभियंता (विकास नियोजन) यासारख्या इतर विभागांच्या धरतीवर व्यवसाय सुलभतेसाठी उद्यान विभागामार्फत नोंदणीकृत अनुज्ञाप्ती झाड तज्ज्ञ (Register Empanel Tree Expert) नियुक्ती करावी, असे प्रस्तावित करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने निश्चित केलेली आवश्यक अर्हता विचारात घ्यावी, जेणेकरून त्यांच्यामार्फत झाडांची निगा/सुरक्षा राखण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल.

१३. रस्ते व इतर प्रकल्प विभागाच्या तसेच उद्यान विभागाच्या कर्तव्य सूचीमध्ये प्रकल्प व उदयान विभाग यांच्या संयुक्त पाहणीचा समावेश करणे.

१४. कुठल्याही उपयुक्तता संस्था साठी जर खोदकाम करायचे असेल तर मुळाच्या आजूबाजूला काम करत असताना कुठल्याही परिस्थितीत जेसीबी अथवा पोकलेन सारखे मोठे संयंत्र वापरण्यावर पूर्णपणे मनाई करावे व ते काम मनुष्यबळामार्फत करावे. कुठल्याही परिस्थितीत झाडाच्या मुळांना इजा पोहोचणार नाही याची परिपूर्ण खबरदारी घेण्यात यावी व याची संपूर्ण जबाबदारी प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेवर दयावी. तसेच खोदकाम झाल्यानंतर मुळा सभोवतालची जागा ही उद्यान विभागाने प्रमाणित केलेल्या लाल मातीने भरून रूट बेसिन अबाधित राहील याची काळजी घ्यावी.

१५. इथून पुढे येणाऱ्या पावसाळ्यानंतरच्या ऑक्टोबर २०२६ पासून चालू होणाऱ्या सर्व कामांमध्ये झाडाची मुळे अबाधित राहून झाडांच्या मुळांना कोणताही धोका /इजा पोहोचणार नाही या दृष्टीने प्रकल्प संस्थातर्फे परिपूर्ण काळजी घेण्यात यावी असे परिपत्रक उदयान विभागामार्फत प्रसारीत करण्यात यावे.

१६. आर्द्र हवामानामुळे झाडांना बुरशी लागण्याची संभावना असते त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जसे कीटकनाशक वापरले जाते तसे बुरशी प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित व्हावी.

१७. रस्त्यालगतच्या वृक्षारोपणासाठी उद्यान विभागाने योग्य ते धोरण सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निश्चित करावे.

१८. उद्यान विभागाच्या कर्तव्य सूचीमध्ये खासगी सोसायटीमधील झाडांचा समावेश आहे, परंतु यामध्ये अगोदरच महानगरपालिकेच्या हद्दीतील उदयान कार्यभार कर्मचाऱ्यांवर जास्त असल्याने खासगी सोसायटीमधील झाडांबाबतचे Audit संबंधित सोसायटीने Empanel केलेल्या वृक्ष तज्ञांकडून घेण्याबाबत धोरण ठरवावे.

१९. कडक उन्हाळयाच्यावेळी झाडांना पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने झाडांवर ताण येऊन झाडांची मुळे कमकुवत होण्याची संभावना असल्याकारणाने, जशी झाडाचा डोलारा कमी करण्यासाठी झाडांची त्रिकोणामीतीत छाटणी करण्याची यंत्रणा असते तशीच शक्य असल्यास, उन्हाळयाच्या दिवसात झाडांच्या मुळांशी खत/पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एखादया यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात यावी.

२०. उद्यान विभागाने मुंबईतील सोसायटींच्या बाहेरील बाजूस रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांबाबत संबंधित सोसायटीतील वृक्षप्रेमींना ‘वृक्षमित्र संकल्पना’ याबाबत जनजागृती करावी. ज्यामध्ये सदर झाडांची काळजी घेणे, त्यांची जोपासना करणे इ. बाबींचा समावेश करुन वृक्षसंवर्धन करावे. अशा वृक्षप्रेमींचा सत्कार करुन सदर बाबीस प्रसार माध्यमांमध्ये प्रसिध्दी देण्यात यावी. जेणेकरुन सदर ‘वृक्षमित्र संकल्पनेस’ प्रोत्साहन मिळेल.

२१. सदर संकल्पनेदरम्यान वृक्षप्रेमी /स्थानिक रहिवाशी यांना एखादे झाड सुस्थितीत नसल्याबाबत शंका उपस्थित झाल्यास त्यांना सदर बाब तात्काळ उद्यान विभागाला कळविण्याबाबत एखादे अॅप/यंत्रणा उद्यान विभागाने विकसित करावी.

२२. महानगरपालिका आयुक्त यांच्या दिनांक ३ जुलै २०२६ रोजीच्या परिपत्रकामधील ‘पायाभूत सुविधांची पुर्नबांधणी करतेवेळी अस्तित्वातील झाडांची निगा राखण्याबाबत’ पारित केलेल्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे.

२३. महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संवर्धन आणि संरक्षण अधिनियम १९७५ तसेच महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका, उद्यान विभाग यांनी वृक्ष संवर्धन संबंधात वेळोवेळी प्रसारीत केलेली परिपत्रके /मार्गदर्शक तत्वे यांचे अनुपालन व्हावे.

२४. झाडांची नियमित पाहणी, जोखीम मूल्यांकन, छाटणी, देखभाल व आपत्कालीन प्रतिसाद यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दतीबाबत शिफारसी.

२५. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची शक्यता कमी करण्यासाठी अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त झाडांची नियमित पाहणी, जोखीम मूल्यांकन, छाटणी, देखभाल व आपत्कालीन प्रतिसाद यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दतीबाबत खालीलप्रमाणे शिफारसी करण्यात येत आहेत.

चौकशी समितीने केलेल्या शिफारशी

१. वृक्ष छाटणीचे काम सुरू असताना वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. हे वृक्ष तज्ज्ञ उद्यान विभागाशी समन्वय साधून संबंधित प्रकल्पातील झाडांना वैज्ञानिकदृष्ट्या कोणतीही इजा पोहचणार नाही याची काळजी घेईल. त्याची जबाबदारी प्रकल्प राबविणाऱ्या खात्याची असेल.

२. झाडांचे संरक्षण व्हावे, हा संबंधित प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे आणि तशी अट निविदांमध्ये समाविष्ट करण्यात यावी. रस्त्यांचे काँक्रीटीकरण करीत असताना झाडांच्या बुंध्यालगतचा ३m x ३m भाग हा डांबरी पृष्ठ भागामध्ये ठेवावा जेणेकरुन झाडाच्या सदृढतेसाठी आवश्यक असणारे वायुविजन व पाणी झाडांच्या मुळांपर्यंत पोहचू शकेल.

३. उद्यान विभागाने प्रकल्प राबविण्याऱ्या विभागांसाठी वृक्ष सल्लागाराच्या मदतीने प्रकल्पातील बाधित वृक्षांच्या सुरक्षिततेबाबत धोरणात्मक प्रमाणित मानक कार्यप्रणाली (S.O.P.) तयार करुन सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन ती वितरीत करावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात यावा, अशा शिफारशी समितीने केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *