Purushottam Maas Katha: दुर्वासा ऋषींचा इशारा! पुरुषोत्तम मासाचा अपमान केल्यावर काय घडले?


Adhik Maas Story: सूतजी सांगतात की, मेधावी ऋषींच्या कन्येला भेटण्यासाठी महान तपस्वी ऋषी दुर्वासा आले. त्यांनी कन्येची व्यथा ऐकून तिला पुरुषोत्तम मासाच महिमा सांगितला, पण त्या कन्येच्या मनात काही शंका निर्माण झाली. याबद्दल सविस्तर वाचूया पुरुषोत्तम मास माहात्म्य दहावा अध्याय!

जेव्हा त्या दुःखी कन्येने महर्षी दुर्वासा ऋषींसमोर आपले दुःख व्यक्त केले, तेव्हा त्या दयाळू ऋषींनी तिच्या कल्याणासाठी एक अत्यंत गुप्त आणि महान उपाय सांगितला. त्यांनी सांगितले की लवकरच येणारा पुरुषोत्तम मास हा सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि या महिन्यात केलेले स्नान, दान, जप आणि भगवंताची पूजा असंख्य पटींनी फळ देणारी असते. या पवित्र महिन्यात फक्त एकदाच तीर्थस्नान केल्यानेही हजारो वर्षे तपश्चर्या आणि गंगास्नान केल्याइतके पुण्य प्राप्त होते. पुरुषोत्तम मास स्वतः श्रीकृष्ण यांना अत्यंत प्रिय आहे आणि या काळात केलेल्या भक्ती, पूजा आणि उपासना यामुळे मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

दुर्वासा ऋषींनी आपल्या जीवनातील एक प्रसंगही सांगितला. त्यांनी क्रोधाच्या भरात राजा अंबरीष यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भगवंताच्या सुदर्शन चक्रामुळे ते स्वतःच मोठ्या संकटात सापडले. त्यावेळी या पुरुषोत्तम मासाच्या प्रभावामुळेच ते भयंकर संकटातून वाचू शकले. अशा प्रकारे त्यांनी कन्येला श्रद्धेने आणि दृढ निश्चयाने अधिकामासाचे व्रत करण्याचा उपदेश केला.

परंतु त्या कन्येला पवित्र पुरुषोत्तम मासाबद्दल मनात शंका निर्माण झाली. तिने ऋषींच्या बोलण्यावर अविश्वास व्यक्त करत म्हटले, ‘कार्तिक किंवा वैशाखसारख्या महिन्यांपेक्षा पुरुषोत्तम मास अर्थात ‘मलमास’ कसा काय श्रेष्ठ असू शकतो? पुरुषोत्तम मासाचे महत्त्व समजून घेण्याऐवजी तिने त्याचा तिरस्कार केला.

पुरुषोत्तम मासाचा अनादर ऐकून दुर्वासा ऋषी अत्यंत क्रोधीत झाले. त्यांचा क्रोध डोळ्यात स्पष्ट दिसत होता, पण दयेपोटी त्यांनी शाप दिला नाही. त्यांनी मनात विचार केला की, ही कन्या अज्ञानामुळे असे बोलत आहे आणि तिला अद्याप योग्य समज आलेली नाही. म्हणून त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, ‘पुरुषोत्तम मासाचा अनादर केल्याचे फळ तिला नक्कीच भोगावे लागेल, मग ते या जन्मात असो किंवा पुढील जन्मात.’

यानंतर दुर्वासा ऋषी तेथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्या कन्येचं तेज हळूहळू क्षीण होऊ लागलं. तेव्हा ती स्वतःच्या निर्णयावर विचार करू लागली, पण तोपर्यंत तिने वेगळा मार्ग निवडला होता. शेवटी तिने ठरवले की ती भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करेल, कारण तिच्या मते तिच्या दुःखांचे निवारण फक्त तेच करू शकतात. अशा प्रकारे तिने पुरुषोत्तम मासाचे महत्त्व बाजूला ठेवून स्वतःच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतला.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *