Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tuljabhavani) या मालिकेत अबालवृद्धांना खिळवून ठेवणारा सर्वात मोठा शक्तिरूप दर्शनाचा टप्पा सुरू आहे. निर्जला ते आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) या अत्यंत पवित्र आणि कर्मशुद्धीच्या काळात मालिकेत ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ पाहायला मिळत आहे. भुलोकावर भक्तीचा चातुर्मास सुरू होऊ नये म्हणून पाताळदेवी आणि तिचा चेला भुजंगाने अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार विकारांचा वापर करून एक भयानक कारस्थान रचले आहे. यातील पहिल्या संकटाचा निपात केल्यानंतर, आता कथा एका अत्यंत थरारक आणि विस्मयकारक टप्प्यावर आली असून आई तुळजाभवानीच्या ‘भयतारिणी’ रूपाचे विराट दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.
भयाच्या अंधाराचा नाश करण्यासाठी आई तुळजाभवानी प्रकटणार अलौकिक ‘भयतारिणी रूपात. ‘दिव्य स्वस्तिकाचा’ हा दुसरा आठवडा शेतकरी कुटुंबातील रायबावर आलेल्या भयानक संकटाचा आहे. भुजंग आणि पाताळदेवीने मिळून रायबाच्या मनात भीतीचे असे विष पेरले आहे, ज्यामुळे त्याला स्वतःच्याच जवळच्या लोकांमध्ये भयानक आणि अमानवी भास होऊ लागले आहेत. रायबा या सततच्या भीतीपोटी कोणावरच विश्वास ठेवेनासा झाला असून स्वतःला सर्वांपासून दूर करू लागला आहे. पण जेव्हा हे संकट भयावह रूप घेईल, तेव्हा मानवी मनातील भीतीचा नायनाट करण्यासाठी आदिमाया सज्ज होणार आहे.
रायबाच्या मनातील भीती कायमची संपवण्यासाठी ती चक्क एका बलाढ्य ‘ब्रह्मराक्षसा’ला पाचारण करणार आहे. हे करण्यामागे तिचा उद्देश भीतीवर मात करण्याचे एक नवे उदाहरण निर्माण करण्याचा आहे.
एका बाजूला हा भीतीचा अंगावर काटा आणणारा थरार आणि तुळजाभवानीचा ‘भयतारिणी’ अवतार, तर दुसऱ्या बाजूला तुळजा आणि महादेवांना एकत्र आणण्यासाठी लक्ष्मी-विष्णूंची युक्ती यामुळे कथेला एक भावनिक जोड मिळणार आहे. तसेच, महिषासुर आता देवीची शक्ती असलेला ‘चिंतामणी दगड’ हस्तगत करण्यासाठी कोणता नवा डाव टाकणार, याने एकूण वातावरण अधिकच तापणार आहे.

हा प्रवास तितकासा सोपा नाही, कारण पाताळशक्तीने निर्माण केलेल्या या विकारांचा प्रभाव खूप मोठा आहे. अशा वेळी रायबा या अथांग भीतीचा सामना कसा करणार? संकटांशी झुंजायचे बळ देणाऱ्या आई तुळजाभवानीचा ‘मूळ मंत्र’ रायबाचे आयुष्य कसे बदलणार? आणि जेव्हा तुळजा भवानीचे अतीव तेजाने उजळलेले विराट ‘अष्टभुजा रूप’ पाठीशी उभे राहील, तेव्हा भीतीचे साम्राज्य कसे विरघळणार, हे पाहणे कमालीचे ठरेल. भय, भक्ती, आणि भावनांचा हा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना दैवी आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेल. ब्रह्मांडात ताऱ्यांचे निर्माण झालेले अंधुक ‘दिव्य स्वस्तिक’ पूर्णपणे उजळण्याचा हा प्रवास पुढे कसा सरकणार, हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’, आई तुळजाभवानी मालिकेत कलर्स मराठीवर दररोज पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव