शरद पवार आणि सुप्रिया सुळे Image Credit source: social media
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहमी अचूक आणि सटीक राजकीय भविष्यवाणी करत असतात. राज्यात किंवा केंद्रात कुणाची सत्ता येईल याचा अचूक अंदाज त्यांना आधीच आलेला असतो. त्यानुसार ते आपली राजकीय भूमिका ठरवत असतात. कधी कधी ते हसता हसता आतल्या बातम्याही देत असतात. त्यांनी काल पुण्यात असताना अशीच एक महत्त्वाची बातमी दिली आहे. शरद पवार हे एनडीएसोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते, असा मोठा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
रामदास आठवले काल पुण्यात होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केलं. त्यांनी शरद पवार यांच्याबद्दलही भाकीत केलं. शरद पवार मोठे नेते आहे. त्यांचा आदर आहे. 2014 किंवा 2019 मध्ये शरद पवार आमच्यासोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते, असा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे मंत्री झाल्या असत्या
अजित पवार असताना अनेक निर्णय झाले होते. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करायचे ठरले होते, अशा चर्चा होती. पण आता अजित पवार नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आता होईल असे वाटत नाही. पण शरद पवार यांनी एनडीए सोबत यायला हवे होते, असं रामदास आठवले म्हणाले.
चोरांना शिक्षा होणार
यावेळी त्यांनी राम मंदिरातील चोरीवरही भाष्य केलं. राम मंदिरातील चोरी मोठी आहे. मोठा घोटाळा झाला आहे. राम मंदिरासाठी जगभरातून पैसे दिले आहेत. मोठा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल झाला आहेय. काही जणांना अटक केली आहे. प्रकरण गंभीर आहे. चोरी करणाऱ्यांना शिक्षा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
आमच्याकडे बहुमत
महिला आरक्षणावरून त्यांनी विरोधकांवर हल्ला केला. केंद्रात महिला आरक्षणाला विरोधकांनी विरोध केला. आता मात्र आमच्याकडे संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल. 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांना अधिक जागा मिळतील. मोठे मतदारसंघ आहेत. डीलिमिटेशन बिल नक्की पास होणार आहे. यावेळी आमच्याकडे बहुमत आहे, असा दावाही त्यांनी केला.
लोकसंख्येच्या प्रमाणात…
यावेळी त्यांनी आरक्षणातील उपवर्गीकरणावरही प्रतिक्रिया दिली. उपवर्गीकरणमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, देशांमध्ये बाराशे जाती आहेत. ज्या राज्याला उपवर्गीकरण करायचं असेल तर त्यांनी करावं. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात सरकारने नेमली आहे. त्याचा रिपोर्ट बाहेर आला नाही. तो रिपोर्ट तयार आहे. तो बाहेर आला नाही. बौद्ध, चर्मकार समाजाचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. समाजाला शिक्षणात पुढे कसं आणायचं याचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. अनेक अधिकारी येत आहेत. मातंग समाजाला पुढे कसे आणायचे हे ठरवले पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरणांमध्ये समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली.