Vinayak Raut on Girija Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच (Domestic Violence) ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ (Anti-Superstition Act) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत. 2017 ते 2018 पर्यंत गितेश आणि आपल्यात कुठलेच शारीरिक संबंध नव्हते, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी केला. तसेच गितेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी सासरच्यांनी अघोरी कृत्य केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, गिरीजा राऊतांचे हे सगळे आरोप विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत फेटाळून लावले आहेत.
Vinayak Raut on Girija Raut: मागील महिन्यातच सुरक्षा काढली, यामागे मोठे राजकीय षडयंत्र
आपली पार्श्वभूमी राजकीय आहे आणि आपण राजकारणात सक्रिय आहात, याच पार्श्वभूमीवर आपल्या विरोधात हे षडयंत्र रचले जात आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता विनायक राऊत यांनी यामागे राजकीय हात असल्याचा थेट संशय व्यक्त केला. “मी आज आपल्या समोर तो पुरावा उघड करणार नाही, पण यात जे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे मी काही दिवसांनी नक्कीच सांगेल. पण गेल्या महिन्यातच आमचे प्रोटेक्शन पूर्णपणे काढून टाकण्यात आले. आम्ही मागणी केली तर त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिला. त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामधून आम्ही नक्कीच सहीसलामत बाहेर पडू,” असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
Vinayak Raut on Anjali Damania: अंजली दमानियांच्या मागणीवर विनायक राऊतांचे उत्तर
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करावीच, त्यामध्ये आमचा कुठलाही अडथळा नाही. पोलीस ठाण्यात ज्या वेळेस, ज्या ज्या वेळेला आम्हाला चौकशीसाठी बोलवतील, त्या त्या वेळेला आम्ही स्वतः हजर राहणार आहोत,” असे त्यांनी म्हटले आहे.
Vinayak Raut on Girija Raut: 2 कोटींवरून थेट 12.5 कोटींवर गेली डिमांड; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
या संपूर्ण प्रकरणावर विनायक राऊत यांनी गिरीजा राऊत यांच्यावरच पैशांसाठी ब्लॅकमेलिंग करत असल्याचा गंभीर आरोप केला. “त्या केवळ वायफळ बडबड करत आहेत, कोणाच्या तरी सांगण्यावरून त्या हे सर्व बोलत आहेत. त्यांनीच दिलेल्या पेपरवरून मी बोलत आहे, त्यांनी दिलेल्या तक्रारीत काय म्हटले आहे ते पाहा. जर त्या म्हणतात की ‘मला भीती वाटत असल्याने मी आई-वडिलांना सोबत घेऊन असायचे’, मग त्यांनी तेव्हाच तक्रार का दाखल केली नाही? सासरी येताना किती आणले आणि माहेरी जाताना किती नेले हे त्यांनी एकदा सांगावे.
त्यांच्या मागण्या दिवसांदिवस दुप्पटीने वाढत होत्या. आधी 2 कोटी रुपयांची मागणी होती, नंतर फ्लॅट, गाडी मागितली, त्यानंतर ती मागणी 5 कोटींवर गेली. आता तर थेट 12 कोटी 50 लाख रुपये इतकी मोठी डिमांड वाढलेली आहे. यामध्ये 5 लाख रुपये दरमहा, 10 कोटी रुपये एकरकमी, दरमहा भाडे 1 लाख रुपये आणि 3 बीएचके फ्लॅटचा ईएमआय तुम्हीच भरायचा, अशी मागणी केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.
आणखी वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से