Last Updated:
या शारीरिक अडचणीवर मात करत ते एका पायाच्या जोरावर पायी वारी करत आहेत. विशेष म्हणजे, एका पायात चप्पलही न घालता ते विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
पुणे : आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकरी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. या वारीदरम्यान अनेक वारकरी आपल्या आयुष्यातील दुःख, वेदना आणि संकटे विसरून केवळ पांडुरंगाचे दर्शन घेण्याच्या भक्तिभावाने चालत असतात. असाच एक वारकरी म्हणजे इंदापूरचा ऋषिकेश शिंदे. ऋषिकेश यांचा एक पाय नसून ते दिव्यांग आहेत. मात्र, या शारीरिक अडचणीवर मात करत ते एका पायाच्या जोरावर पायी वारी करत आहेत. विशेष म्हणजे, एका पायात चप्पलही न घालता ते विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
ऋषिकेश शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या घरात संत परंपरा असून त्यांचे वडील अनेक वर्षांपासून नियमित वारी करतात. त्यांच्याकडूनच वारीचे संस्कार मिळाले आणि हीच परंपरा पुढे नेण्याची इच्छा त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून होती. मात्र, एका पायाने दिव्यांग असल्यामुळे पायी वारी करण्याचे धाडस होत नव्हते. यंदा मात्र त्यांनी पायी पंढरपूरला जाण्याचा निर्धार केला असून ते विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वाटचाल करत आहेत.
ते पुढे म्हणाले की, एका पायात चप्पल घालून चालणे शक्य नसल्यामुळे ते एका पायात चप्पल न घालताच वारी करत आहेत. विठुरायाचे दर्शन घेण्याची ओढच हा प्रवास करण्याची ताकद देत आहे. तसेच, या प्रवासात अनेक वारकरी वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत असल्याने हा प्रवास अधिक सोपा होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लहानपणी खेळताना झालेल्या अपघातात माझा एक पाय गमवावा लागला. मात्र, त्यामुळे मी कधीही खचून गेलो नाही. आमच्या घरातील वारीची परंपरा पुढे नेण्यासाठी यंदा पायी वारी करण्याचा निर्धार केला आहे. आपली संत परंपरा आणि संस्कृती तरुणांनी जपली पाहिजे. प्रत्येक तरुणाने आयुष्यात एकदा तरी वारीत सहभागी व्हावे. विठुरायावरील श्रद्धेमुळेच मी हा प्रवास करत असून, वाटेत अनेक वारकरी मला मदत करत आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिक सोपा होत असल्याचं ऋषिकेशने सांगितलं. श्रद्धेचा, जिद्दीचा आणि विठ्ठलभक्तीचा हा प्रवास अनेक वारकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Pune,Maharashtra