गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील राज नगर एक्सटेंशन (Raj Nagar Extension) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी (Ghaziabad Crime News) घटना समोर आली आहे. आज (शनिवारी, ता११) च्या पहाटे एका बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये एका ७ वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला आहे. हत्येपूर्वी या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सामूहिक अत्याचार, हत्या आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे.(Ghaziabad Crime News)
Crime News: मॉलच्या तळमजल्यावर सापडला मृतदेह
पीडित मुलीचे कुटुंब मूळचे बिहारचे असून, तिचे आई-वडील नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज नगर एक्सटेंशन येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतात. ते आपल्या मुलीसह त्याच ठिकाणी राहत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी आणि तेथील इतर मजुरांनी तिचा अनेक तास शोध घेतला. अखेर रात्री १ वाजेच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर (Ground floor) तिचा मृतदेह आढळून आला. यानंतर तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली.(Ghaziabad Crime News)
Crime News: तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा संशय
पीडित बालिकेला आधी फुस लावून किंवा जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले असावेत, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, अत्याचार केल्यानंतर तिला त्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले का, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला? या बाजूनेही पोलीस तपास करत आहेत. या घटनेचा नेमका क्रम काय होता, हे शवविच्छेदन (Post-mortem) अहवाल आणि फॉरेन्सिक विश्लेषणानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमने (FSL) गुन्ह्याच्या ठिकाणाची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.(Ghaziabad Crime News)
Crime News: पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, संशयित ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार, हत्या आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) यांसारख्या गंभीर कलमांखाली एफआयआर (FIR) नोंदवला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
एसीपी (ACP) प्रियश्री पाल यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. “राज नगर एक्सटेंशनमधील एका बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये ७ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची तात्काळ दखल घेत नंदग्राम पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी केली असून पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल (FSL) टीमला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे,” अशी माहिती एसीपी प्रियश्री पाल यांनी दिली.
पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणीचे निष्कर्ष आणि ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.