‘मी टू’चे आरोप, दारूच्या व्यसनाने उद्ध्वस्त आलोक नाथची आता अशी अवस्था; बालमित्राचा खुलासा – Marathi News | Alok nath quits acting after me too controversy destroyed career now living in isolation avoids people childhood friend revealed


हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ हे ‘संस्कारी बाबूजी’ या नावानेही ओळखले जातात. कारण अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी संस्कारी वडिलांचीच भूमिका साकारली आहे. या भूमिकांमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र 2018 मध्ये ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर काही अभिनेत्रींनी अत्यंत धक्कादायक आरोप केले होते. या आरोपांनंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार क्वचितच दिसले. ‘मी टू’ मोहिमेचा त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. याबद्दलचा खुलासा खुद्द त्यांचे बालमित्र आणि अभिनेते राजेश पुरी यांनी केला आहे. आलोक नाथ आता कसं आयुष्य जगत आहेत आणि ते किती बदलले आहेत, याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजेश पुरी म्हणाले, “जेव्हा आलोक नाथ यांच्यावर मी टूचे आरोप झाले होते, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. कारण ते एक सुसंस्कृत अभिनेते म्हणून ओळखले जात होते. या आरोपांनंतर त्यांनी स्वत:ला सर्वांपासून पूर्णपणे दूर केलं आहे. ते इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाले आहेत. आलोक खूप निर्मळ मनाचा माणूस आहे. तो आता पूर्णपणे बदलला आहे. तो आता मद्यपान करत नाही. तो खरंच खूप प्रेमळ आहे. पण त्याच्या दोन कमकुवत बाजू होत्याच. पहिली म्हणजे, एखादी गोष्ट खटकली, तर तो ती सहन करू शकत नसे. दुसरी म्हणजे तो खूप दारू प्यायचा. दारू प्यायल्यावर तो खूप आक्रमकपणे वागायचा. या गोष्टींचा त्याच्यावर नकारात्मक परिणाम झाला.”

राजेश यांनी पुढे असंही सांगितलं की, त्यांनी आलोक नाथ यांच्यासोबत अनेक आऊटडोअर चित्रपटांमध्ये काम केलं होतं, पण त्यांना कोणाशीही गैरवर्तन करताना कधीही पाहिलं नव्हतं. मात्र यावेळी राजेश यांनी अशी स्पष्ट कबुली दिली की दारू प्यायल्यानंतर आलोक नाथ यांचं वागणं पूर्णपणे बदलत असत. “दारू प्यायल्यानंतर तो खूप आक्रमक आणि अनियंत्रित होत असत. त्यांनी आता अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते लोकांशी क्वचितच संवाद साधतात. मी त्याला अनेकदा भेटायला बोलावलं होतं, मात्र त्याने नेहमीच मला नकार दिला”, असं ते पुढे म्हणाले.

आलोक नाथ यांच्या आयुष्यात इतका बदल झाला आहे की गेल्या काही काळापासून ते अध्यात्माकडे वळले आहेत. “जे घडून गेलं ते गेलं. आगीशिवाय धूर निघत नाही. त्याला गोष्टींचा पश्चात्ताप होतो आणि जे काही घडलं ते चांगलं नव्हतं. आता त्याला कोणालाही सामोरं जायचं नाहीये. आम्ही दोघंही एकाच गुरूवर विश्वास ठेवतो आणि आलोकनेही त्यांचं अनुसरण करण्यास सुरुवात केली आहे. ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आले आहेत. पण ते सत्संगांना उपस्थित राहत नाहीत”, असं राजेश यांनी सांगितलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *