Ashadhi Wari 2026 : शिस्त आणि समर्पणाचा अनोखा आदर्श, वारीत रोज मिळतं ताजं जेवण, कसं असतं नियोजन, पाहा Video | पुणे बातम्या (Pune News)


आजरेकर दिंडीतील वारकरी सावित्री गुरव गेली 20 वर्षे वारी करत आहेत. त्या सांगतात, वारीचा अनुभव शब्दांत सांगता येणार नाही. वर्षभर आम्ही वारीची वाट पाहत असतो. पाऊस असो किंवा ऊन, माऊलीच्या भेटीसाठी पायी चालण्याचा आनंद वेगळाच असतो.

त्या पुढे सांगतात की, दिंडीत दररोज ताजे आणि पौष्टिक जेवण तयार केले जाते. भाकरी, चपाती, भात, वरण, आमटी, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, कुरमा अशा विविध पदार्थांचा समावेश असतो. प्रत्येक वारकरी आपल्या परीने आर्थिक योगदान देतो. त्यातून तांदूळ, पीठ, डाळी, मसाले, भाज्या आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी केले जाते. दररोज ताज्या भाज्या वापरून स्वयंपाक केला जातो.

दिंडीत केवळ स्वयंपाकच नाही, तर प्रत्येक वारकरी सेवाभावाने काम करतो. कोणी भाजी चिरतो, कोणी भांडी घासतो, कोणी पोळ्या-भाकऱ्या बनवतो, तर कोणी जेवण वाढण्याची जबाबदारी सांभाळतो. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. सर्वजण मिळून एक कुटुंब म्हणून ही सेवा पार पाडतात.

आजरेकर दिंडीचे प्रमुख पांडुरंग पाटील आजरेकर महाराज यांनी सांगितले की, मी गेली 24 वर्षांहून अधिक वर्ष वारी करत आहे. आमच्या दिंडीची परंपरा 1854 सालापासून सुरू आहे. त्या काळापासून दिंडीचे नियम आणि शिस्त आजही कायम ठेवली आहे. आमच्या दिंडीत सुमारे 800 वारकरी सहभागी होतात.

इतक्या मोठ्या संख्येने वारकरी असतानाही अन्नधान्य, भांडी आणि स्वयंपाकाचे साहित्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ट्रकची व्यवस्था केली जाते. ट्रकमधून आवश्यक साहित्य पुढील मुक्कामाच्या ठिकाणी आधीच पोहोचवले जाते. तेथे स्वयंपाकी आणि स्वयंसेवक जेवण तयार करतात. त्यामुळे वारकरी मुक्कामी पोहोचल्यानंतर त्यांना वेळेत गरम आणि ताजे जेवण मिळते.

वारीत अनेक भाविक दानधर्म करण्यासाठी पुढे येतात. काही जण फळे, पाणी, फराळ किंवा इतर खाद्यपदार्थ देतात. मात्र प्रत्येक दिंडीची स्वतःची व्यवस्था असल्याने नियोजनानुसारच या सेवांचा स्वीकार केला जातो. प्रत्येक ट्रक आणि स्वयंसेवक गटावर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात.

भक्ती, शिस्त, समर्पण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजे वारी. पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने चालणाऱ्या या प्रवासात जेवणाची व्यवस्था ही केवळ पोट भरण्यापुरती नसून, ती सामूहिक सहकार्य, नियोजन आणि वारकरी परंपरेतील सेवाभावाचे जिवंत उदाहरण असल्याचे या दिंडीतून पाहायला मिळते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *