आमचा माणूस कुठेय? मोशी दुर्घटनेला 55 तास पूर्ण, 8 जणांचा शोध न लागल्याने नातेवाईकांचा टाहो | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

52 तासांहून जास्त काळ उलटला असून मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा बांध फुटताना दिसत आहे.

News18
News18

पिंपरी चिंचवड:  मोशी कचरा डेपोतील इमारत दुर्घटनेला 52 तासांहून जास्त काळ उलटला असून मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा बांध फुटताना दिसत आहे. बचावकार्याला आणखी वेग हवा होता अशी अपेक्षा या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

कचऱ्याचा महाकाय डोंगर कोसळून मोशीतील ग्रीन वेस्ट एनर्जीची इमारत कोसळून आता दोन दिवस उलटले. मात्र अद्यापही ढिगाऱ्याखालील 8 कर्मचाऱ्यांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही.इमारतीच्या गेटजवळ त्यांचे कुटुंबिय, मित्रपरिवार डोळे लावून बसलेत पण त्यांचा माणूस काही बाहेर येत नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या सुटकेसाठी सर्व उपलब्ध यंत्रणा पूर्ण क्षमतेनं राबवण्याची मागणी केली जात आहे. मोशीतील या दुर्घटनेकडे मंत्री-आमदार-नगरसेवक अशा सगळ्यांनीच पाठ फिरवल्याचा आरोप अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनेच्या दिवशी संध्याकाळी आणि रात्री अशा दोन वेळा घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. मात्र त्यानंतर ते इकडे फिरकले नाहीत

मोशी दुर्घटनेकडे नेत्यांची पाठ?

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बचावकार्याचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, मात्र प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी त्या एकदाही आलेल्या नाहीत. स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनी एकदाही दुर्घटनास्थळाला भेट दिलेली नाही भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे दुर्घटनेच्या दिवशी एकदाच घटनास्थळी आले त्यानंतर त्यांनी इथं हजेरी लावलेली नाही. काही स्थानिक नगरसेवकांनी येऊन आरोप-प्रत्यारोप केले पण अडकलेल्यांच्या कुटुंबाला धीर देण्याचा किंवा बचावकार्य वेगानं कसं होईल याचा प्रयत्न कोणीही केला नसल्याचं दिसून येत आहे. पहिल्या दिवसानंतर बचावकार्याचा वेग मंदावल्याचा आरोप करण्यात येत आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी या कुटुंबियांनी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं.

9 जणांची सुटका

इमारतीच्या ढिगाऱ्याखालून गुरुवारी सकाळपर्यंत 9 जणांची सुटका करण्यात आली होती. यात आनंद इंगळे यांचाही समावेश आहे. तब्बल 9 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इंगळे यांना जिवंत बाहेर पडू शकणार नाही असं वाटलं आणि त्यांनी एक शेवटचा सेल्फी काढून कुटुंबियांना पाठवला होता पण त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. जळगावच्या भावेश वाणीला मात्र सुखरुप बाहेर पडता आलं नाही. ढिगाऱ्याखाली दबल्यानं तसंच ऑक्सिजन न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न

8 जुलैला दुपारी 2 वाजल्यापासून एनडीआरएफ, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर यंत्रणांकडून अविरत बचावकार्य सुरू आहे. इमारतीचा ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊस थांबल्यानंतर आता इमारतीच्या आत शिरुन सुरक्षित मार्ग तयार करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. एरवी उद्घाटनं,लोकार्पण सारख्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून श्रेय लाटणारे लोकप्रतिनिधी आज एवढी मोठी दुर्घटना घडली तरी इथं फिरकतही नाहीत. नेहमी आश्वासनाची खैरात करणारे आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या आणाभाका खाणाऱ्या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या जीवाचं मोल वाटत नाहीय का असा प्रश्न या निमित्तानं पडत आहे.

मराठी बातम्या/पुणे/

आमचा माणूस कुठेय? मोशी दुर्घटनेला 55 तास पूर्ण, 8 जणांचा शोध न लागल्याने नातेवाईकांचा टाहो



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *